लग्न म्हटलं की अनेकजण आयुष्यात एकदाच येणारा क्षण असल्याचं सांगत लाखो, करोडो रुपयांची उधळण करतात. श्रीमंतांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकजण थाटामाटात लग्न करण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकजण तर कर्ज काढून मुलांचं लग्न लावताना दिसतात. नातेवाईकांमध्ये आपली पत राहावी यासाठी सुरु असलेला हा निष्फळ प्रयत्न असतो. पण अशावेळी काहीजण मात्र सामाजिक भान जपण्याचं काम करतात. अनेकजण कोर्टात लग्न करुन पैसा दुष्काळ निधीमध्ये किंवा गरिबांना देताना दिसतात. पण मुंबईतील एका तरुणीने एका वेगळ्या पद्धतीने आपलं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
लग्नात आहेर देण्यासाठी पाहुण्यांची नेहमीच गर्दी असते. अनेकदा आहेर पैशांच्या स्वरुपातच असतो. मात्र आहेर देण्याऐवजी अवयव दान करा असं आवाहन या तरुणीने केलं आहे. कोमल कानिटकर असं या तरुणीचं नाव असून ती डॉक्टर आहे. लग्नात येणाऱ्या सर्व पाहुण्यांना तिने अवयव दान करण्याचं आवाहन केलं आहे. थोडक्यात तुमचं अवयव दान हाच माझा आहेर असं कोमल कानिटकर सांगत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात पाच हजार 561 रुग्णांना अवयव दानाची गरज आहे. नेमकी हीच गोष्ट गांभीर्याने घेत कोमल कानिटकरने आपल्या लग्नासाठी उपस्थित राहणाऱ्या मित्र, नातेवाईकांना अवयव दान करण्याचे आवाहन केलं आहे. तसा उल्लेखच कोमलने आपल्या पत्रिकेत केला आहे.
या स्तुत्य उपक्रमाविषयी विचारलं असता कोमलने सांगितलं आहे की, ‘लग्नात कोट्यवधी रुपयांची उधळण करण्यापेक्षा समाजात सकारात्मक पायंडा पाडणार उपक्रम करायला हवेत’. आपल्या या निर्णयाने कोमलने सध्याच्या तरुण पिढीसमोर नक्कीच एक आदर्श ठेवला आहे.