डॉक्टरांनी कर्करोग असल्याचं सांगितल्यानंतर पायाखालची वाळूच सरकते. माणूस मनातून खचून जातो. तसेच कर्करोग कोणता यावरही सर्व अवलंबून असतं. ३६ वर्षीय महिलेला गेल्या काही वर्षांपासून खोकल्याचा त्रास होता. तसेच थुंकीतून रक्त पडत होते. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडे जाणून तपासणी केली. इंदोरच्या डॉक्टरांनी त्यांच्या छातीचा सीटी स्कॅन केल्यानंतर कर्करोग असू शकतो असं सांगितलं. पुढील उपचारासाठी नागपूरला जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्या खचून गेल्या होत्या. सात वर्षे वेदना सहन केल्यानंतर नागपुरातील श्वासनरोगविकारतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांच्याकडे उपचारासाठी आल्या. तेव्हा त्यांनी त्यांना कर्करोग नसल्याचं सांगितलं. तसेच शस्त्रक्रिया करून फुफ्फुसात अडकलेली लवंग बाहेर काढली. यानंतर त्यांना दिलासा मिळाला खरा पण कर्करोगाच्या वेदना मनावर घेऊन त्या इतकी वर्ष जगत होत्या.
सात वर्षांपूर्वी ३६ वर्षीय महिला या लवंग खात असताना कुटुंबीयांसोबत मौजमस्ती सुरु होती. तितक्यात जोरात हसताना लवंग चुकून श्वासननळीकेत अडकली. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. सामान्य खोकला झाला, काही घरगुती उपाय केल्यानंतर बरंही वाटलं. पण सात वर्षानंतर श्वासननळीकेत अडकलेली लवंग दुस्वप्न ठरेल, याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. दोन तीन वर्षांपूर्वी महिलेला वारंवार खोकला आणि श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. तसेच वजन वेगाने कमी होऊ लागले आणि थुंकीत रक्तस्त्राव होऊ लागला. डॉक्टरांनी सीटी स्कॅन केले आणि तिच्या डाव्या फुफ्फुसाच्या खालच्या डाव्या बाजूला एक गाठ आणि न्यूमोनिया विकसित झाल्याचे आढळले. त्यानंतर क्रिम्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा त्यांना आढळून आलं की फुफ्फुसात काही अडकलं आहे. तीन चार टप्प्यात शस्त्रक्रिया केल्यानंतर फुफ्फुसातून एक लवंग बाहेर काढलं. महिलेला डिस्चार्ज मिळाला असून सामान्य जीवन जगत आहे. “हे एक दुर्मिळ प्रकरण होतं. लवंग श्वसननळीकेत जाणं आणि बाहेर काढणं सोपी बाब नाही. अशा शस्त्रक्रिया घटनेनंतर लगेच होतात. जवळपास सात वर्षानंतर लवंग बाहेर काढणं कठीण होतं.”, असं डॉ. अरबट यांनी सांगितलं.
“तोंडाद्वारे फुफ्फुसांमध्ये दुर्बीण घालून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ब्रॉंन्कोस्कोपिक क्रायो बायोप्सी, डायलेटेशनआणि फॉरेन बॉडी रिमुव्हल अशा प्रक्रिया करून सात वर्षांपूर्वी फुफ्फुसात अडकलेली लवंग बाहेर काढली. ही प्रक्रिया करताना कुठलीही चिरफाड करावी लागली नाही. सुरूवातीला क्रायोबायप्सी केली.”, असं डॉ. परिमल देशपांडे यांनी सांगितलं.