Man swallows Keys, knife, nail cutter: देशभरात घडणाऱ्या अनोख्या घटना रोज आपल्या कानांवर येत असतात. अमुक ठिकाणी कोणाचा मृत्यू झाला, तमुक व्यक्तीने आत्महत्या केली. पण, अशाही काही धक्कादायक घटना असतात की, ज्या ऐकून आपल्याला विश्वास बसणे कठीण होऊन जाते. बिहारच्या चंपारण जिल्ह्यात अशीच धक्कादायक एक घटना घडली आहे की, जिथे एका तरुणाच्या पोटातून चक्क चाव्यांचा जुडगा, एक लहान चाकू आणि नेलकटरसह धातूच्या अनेक वस्तू काढण्यात आल्या आहेत. नेमके हे प्रकरण आहे तरी काय?
काही दिवसांपूर्वी पोटात तीव्र वेदना होत असल्याने २२ वर्षीय तरुणाला त्याच्या कुटुंबीयांनी जिल्हा मुख्यालयातील मोतिहारी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर ही फक्त साधी पोटदुखी नसून, काहीतरी भयंकर प्रकार आहे, असे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे तरुणाचे त्वरित एक्स-रे रिपोर्ट करण्यात आले.
एक्स-रे रिपोर्टसमधून आली धक्कादायक माहिती समोर
एक्स-रे रिपोर्ट केल्यानंतर तरुणाच्या पोटात काही धातूच्या वस्तू असल्याचे लक्षात आले. त्यामुळे डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचे प्रमुख डॉ. अमित कुमार यांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, “तरुणावर याआधी मानसिक उपचार सुरू होते. एक्स-रे रिपोर्ट्समध्ये त्याच्या पोटात धातूच्या वस्तू असल्याचे समोर आले आहे.”
पोटात सापडला चाकू, नेलकटर आणि…
या भयंकर शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना धक्काच बसला. डॉ. अमित कुमार याबद्दल सांगाताना म्हणाले, “शस्त्रक्रियेदरम्यान सुरुवातीला तरुणाच्या पोटातून चाव्यांचा जुडगा काढण्यात आला. नंतर आम्ही त्याच्या पोटातून दोन चाव्या, एक चार इंच लांब चाकू व दोन नेलकटर काढले. त्याबद्दल आम्ही तरुणाला विचारले असता, त्याने अलीकडेच धातूच्या वस्तू गिळायला सुरुवात केल्याचे सांगितले. आता तरुण बरा आहे आणि त्याची प्रकृती सुधारत आहे,” असेही डॉक्टर म्हणाले.
रुग्णाबद्दल दिली माहिती
रुग्णाला काही मानसिक आरोग्य समस्या आहेत. त्यासाठी तो सध्या औषधोपचार घेत आहे, तसेच रुग्णाला लवकरच रुग्णालयातून सोडण्यात येईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, याआधीही अशा अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. राजस्थानमधील एका तरुणाने याआधी ५६ ब्लेड, तर एकाने ६३ नाणी गिळल्याच्याही घटना घडल्या आहेत.