जम्मू काश्मिरच्या सिमेकडील भागात गेल्यावर्षभरापासून पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून सतत लष्करावर हल्ले केले जात आहेत. भारतीय जवानही याला चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना कंठस्नान घालत आहे. गेल्यावर्षी शमसाबारी रेंज येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यावेळी ४ दहशतवाद्यांशी एकट्याने दोन हात केले ते हंगपन दादा यांनी. दहशतवाद्यांशी लढताना हंगपन यांना वीरमरण आले. जम्मू काश्मीरमध्ये तब्बल १३ हजार फूटांच्या उंचीवर शमसाबारी रेंज आहे. उंची आणि बर्फाचा फायदा घेत हवालदार हंगपग यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. मातृभूमीसाठी त्यांनी दिलेले बलिदान हे फार मोलाचे होते म्हणूनच दादा म्हणून ओळखल्या जाणा-या हंगपन यांच्यावर सेनेने माहितीपट बनवत त्यांना भावापूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
वाचा : ब्रिटिशांना चकवा देत नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी ‘या’ गाडीतून केले होते पलायन
जम्मू-काश्मीरमध्ये तब्बल १३ हजार फूट उंचीवरील शमसाबारी रेंज येथे दहशतवाद्यांबरोबर लढताना भारतीय लष्करातील हवालदार हंगपन दादा यांना २७ मे रोजी वीरमरण आले होते. एकट्याने चार दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतरच हंगपन दादा धारातीर्थी पडले. शमसाबारी रेंज येथे चार दहशतवादी उंचीचा फायदा घेत भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे हंगपन दादा यांना दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता या दहशतवाद्यांच्या दिशेने धाव घेऊन गोळीबार सुरू केला. हंगपन यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता दोन दहशतवाद्यांना जागीच ठार केले. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे होती. त्यानंतर उर्वरित दहशतवादी पर्वताच्या उतारावरून घसरत पळून जात असताना त्यांचाही हंगपन दादा यांनी पाठलाग केला होता. त्यामध्ये त्यांनी आणखी एका दहशतवाद्याला यमसदनी धाडले, या चकमकीत त्यांच्या सहकार्यांवर दहशतवाद्यांनी प्रचंड गोळीबार सुरू केला होता. या सहकार्यांचे जीव वाचविण्यासाठी हंगपन दादांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात हवालदार हंगपन दादा हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला. त्यातच ते शहीद झाले.
भारतीय लष्कराच्या आसाम रेजिमेंटमध्ये ते १९९७ साली भरती झाले होते. हवालदार हंगपन दादा हे मूळचे अरुणाचल प्रदेशातील बदुरिया या गावचे रहिवासी होते, त्यांची नियुक्ती खास दहशतवादविरोधी मोहिमांसाठी निर्माण करण्यात आलेल्या ३५ राष्ट्रीय रायफल्समध्ये करण्यात आली होती. शमसाबारी रेंज ही १३ हजार फूट उंचीवर होती. आधीच ऑक्सिजनची कमी आणि प्रतिकूल वातावरण अशा परिस्थितीतही हंगपन यांनी लढा दिला. सेनेने त्यांच्यावर एक १२ मिनिटांचा माहितीपट बनवला आहे. त्यादिवशी हंगपन यांनी गाजवलेल्या शौर्याची कथा त्यांच्या सहका-यांनी सांगितली आहे त्यामुळे प्रत्येकाने पाहावा असाच हा माहितीपट आहे.