देशाला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा बसला असून अनके राज्यांना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब अशा अनेक राज्यांनी तर लॉकडाउन जाहीर केला आहे. दरम्यान अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही निर्बंधांचं पालन करत नसल्याचं चित्र आहे. यामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. मात्र इंदोर पोलिसांनी कारवाई करताना एक पाऊल पुढे टाकलं आहे. करोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याने इंदोर पोलिसांनी मालकासहित कुत्र्यालाही अटक केली आहे.

इंदोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून कडक लॉकडाउन करण्याचा आदेश दिला आहे. यादरम्यान बुधवारी संबंधित व्यक्ती कुत्र्याला घेऊन फिरण्यासाठी घराबाहेर पडली होती. यावेळी कोणीही लॉकडाउनचं उल्लंघन करत नाही ना हे पाहण्यासाठी पोलीस गस्त घालत होते. गस्त घालत असतानाच पोलिसांना एक व्यक्ती कुत्र्याला घेऊन रस्त्यावर फिरत असल्याचं दिसलं. हे करोनासंबंधित नियमांचं उल्लंघन असल्याचं सांगत पोलिसांनी कारवाई केली आणि कुत्र्यासहित मालकाला अटक केली.

ही व्यक्ती एक उद्योजक असून पोलिसांनी त्यांना जेलमध्ये टाकल्याचा दावा केला जात होता. पोलिसांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. दरम्यान काही प्राणीमित्र संघटनांनी कारवाईचा निषेध केला आहे.

Story img Loader