कुत्र्याला इमानदार प्राणी का म्हणतात हे आज केरळमधल्या गावक-यांना कळलं असेल. आपल्या मालकाच्या घरात घुसू पाहणा-या विषारी सापाशी त्याने शेवटपर्यंत झुंज दिली. जवळपास अर्धा तास हा कुत्रा या सापाशी झुंजत होता, शेवटी या सापाला ठार मारूनच त्याने आपले प्राण त्यागले.
केरळमधल्या पेरुंबवरगावात राहणा-या गंगाधरण कुटुंबाने कुत्रा पाळला होता. एक महिन्यांचे असताना त्याने कुत्र्याचे पिल्लू आणले होते. नानगेली, त्यांची पत्नी आणि कुत्रा असेच तिघेच या घरात राहायचे. त्यांनी या कुत्र्याचे नाव मोली असे ठेवले होते. पण एके दिवशी त्यांच्या घरात पहाटे पहाटे विषारी साप शिरला. नेहमीपेक्षा मोली फार जोरजोरात भुंकत होता म्हणून काय झाले हे पाहण्यासाठी जेव्हा हे दाम्पत्य घराबाहेर आले तेव्हा त्यांना विषारी सापाशी लढताना मोली दिसला. सापाला घरात प्रवेश करण्यापासून मोली रोखत होता. साप आणि मोली दोघांमध्येही मृत्यूशी झुंज सुरू होती. सगळेच हा प्रकार थक्क होऊन पाहत होते. अखेर मोलीने या सापाला ठार करून दूर फेकून दिले पण तिस-या मिनिटांला त्याचाही मृत्यू झाला. साप डसल्याने तो जागीच मृत्यूमुखी पडला.
पण मरता मरता आपल्या मालकाला मात्र विषारी सापापासून वाचवले याचे समाधान मात्र त्याच्या चेह-यावर होते. कुत्रा हा इमानी प्राणी असतो आणि एकदा का ज्या मालकाने आपल्याला खाऊ पिऊ घालून मोठे केले की त्याच्यासाठी जीवही देण्याची त्याची तयारी असते हे मोलीने दाखवून दिले.