कुत्रा हा सर्वाधिक पाळला जाणारा प्राणी आहे. कुत्र्याच्या प्रामाणिकपणाची अनेक उदाहरणं आपण ऐकली आहेत. काही प्रत्यक्षात पाहिली देखील आहेत. त्यामुळे कुत्रा पाळण्याऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. कुत्र्याला अगदी लहान बाळासारखं घरात वागवलं जातं. त्याला हवं नको ते लाड पुरवले जातात. कारण कुत्रा या प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवत असतो. अनेकदा कुत्रा आपल्यावर केलेल्या उपकारांची परतफेड करत असतो. मालकावर झालेला हल्ला तर त्याला सहनच होत नाही. तसेच घरातील प्रत्येकाच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर असल्यासारखा वावरत असतो. अशीच एक प्रचिती एका कुटुंबाला आली आहे. घरातील पाळीव कुत्र्यामुळे एका लहान मुलीची जीव वाचवला आहे. या प्रसंगाबाबत सांगताना मुलीच्या आईने भावुक पोस्ट लिहीली आहे.
केली अँड्र्यू नावाच्या महिलेने ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. एक फोटो हेन्री नावाच्या कुत्र्याचे आहे, तर दुसरे चित्र हॉस्पिटलमधील बेडवर आपल्या चिमुकलीसह वडील आहेत. ही दोन छायाचित्रे शेअर करताना केलीने सांगितले की, तिचा कुत्रा हेन्री तिच्या आजारी मुलीला तिच्या खोलीत जाऊन रात्री उशिरा उठवण्याचा प्रयत्न करत होता. कुत्र्याची ही कृती तिला अजिबात आवडत नाही. मात्र वारंवार अशी कृती करत असल्याने केली यांना संशय आला आणि त्यांनी मुलीच्या बेडरुमकडे धाव घेतली. तेव्हा कळलं की मुलीचा श्वास मंदावला आहे. त्यामुळे तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. जर वेळीच तिला रुग्णालयात दाखल केलं नसतं. तर मोठा प्रसंग ओढावला असता असं त्यांनी पुढे सांगितलं. हा प्रसंग लिहीताना शेवटी आम्ही कुत्र्याच्या लायकीचे नाहीत असं लिहीलं आहे.
केली अँड्र्यू यांची पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेक प्राणीप्रेमी युजर्सने हेन्रीच्या कृतीचं कौतुक करत गौरवोद्गार काढले आहेत. तसेच पोस्ट वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.