एका कुटुंबात चिंकी, मिंकी व पिंकी यांचा जन्म झाला. त्यांच्या येण्याने कुटुंबीयांसह गावकऱ्यांनाही खूप आनंद झाला. मग कुटुंबीयांनीही वाजत-गाजत अन् नाचत आनंद साजरा केला. एवढेच नव्हे, तर गावकऱ्यांना जेवण अन् मिठाईचे वाटप केले. आता तुम्ही असा विचार करत असाल की, या चिंकी, मिंकी व पिंकी एका महिलेने जन्म दिलेल्या मुली असतील. तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. खरे तर ज्यांचे नामकरण झाले; त्या तिघी मुली नसून, एका कुत्रीने जन्म दिलेली तीन गोंडस मादी पिल्ले आहेत. ही कुत्री ज्या कुटुंबात राहते, त्या कुटुंबाला तिचा खूप लळा लागलाय. त्या कुटुंबीयांनी ती कुत्री प्रसूत झाल्यानंतर तर आनंद साजरा करताना तिच्या पिल्लांचेही जल्लोषात स्वागत केले. यावेळी कुटुंबीयांनी तिच्या पिल्लांचे बारसेही केले आणि चिंकी, मिंकी व पिंकी अशी त्यांची नावेही ठेवली आहेत.
कुत्रीने तीन पिल्लांना जन्म दिल्यानंतर कुटुंबात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कुटुंबीयांतील सर्व सदस्यांनी अगदी जल्लोषात तीनही पिल्लांचे स्वागत केले आणि संपूर्ण गावाला मेजवानी दिली. ज्याप्रमाणे गावात एखाद्या नवजात बालकाच्या बारशाचा सोहळा केला जातो, तसाच सोहळा कुत्रीच्या या पिल्लांचा त्यांच्या जन्मानंतर करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांना भरपूर मिठाई आणि चमचमीत पदार्थांची मेजवानीही देण्यात आली. या कार्यक्रमात सर्व ग्रामस्थांनी सहभागी होत भोजनाचा छान आस्वाद घेतला. एवढेच नव्हे तर रात्री रंगारंग कार्यक्रमही ठेवला होता. पिल्लांच्या जन्मानंतर १२ दिवसांनी संपूर्ण कुटुंबाने गावात १२ कार्यक्रम आयोजित केले होते.
बँड-बाजा वाजवत पिल्लांच्या जन्माचा आनंद साजरा
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील सदर तहसील भागात असलेल्या उधनापूर येथे कुत्रीच्या पिल्लांच्या जन्माचा हा अनोखा सोहळा पार पडला. मिळालेल्या माहितीनुसार- उधनापूर वॉर्डातील झुर्रा यांच्या घरात एक कुत्री राहते. या कुत्रीने तीन पिल्लांना जन्म दिला. त्यानंतर तिन्ही पिल्लांची नावे कुटुंबीयांनी ठेवली होती.
कार्यक्रमाचे आयोजक सुरेश यांनी सांगितले की, आमच्या घरात कुत्रीने तीन पिल्लांना जन्म दिला आहे. गावात जन्मलेल्या बाळाच्या बारशाचा कार्यक्रम होतो, तसाच कार्यक्रम आम्ही या निमित्ताने केला होता.