हत्तींच्या सुळ्यांना काळ्या बाजारात मोठी मागणी आहे. वाट्टेल तितकी किंमत या सुळ्यांसाठी मोजली जाते. त्यातूनच हत्त्तीच्या सुळ्यांचा वापर कलाकुसरीच्या वस्तू बनवण्यासाठी तर होतोच पण पारंपारिक चिनी औषधांमध्ये देखील हत्तीच्या सुळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. म्हणूनच अवैधरित्या मोठ्या प्रमाणात आफ्रिकी देशांतून हत्तीच्या सुळ्यांची तस्करी केली जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे मोठे रॅकेट असून अनेक देशांतील तस्कर यांमध्ये गुंतले. हत्तीची शिकार रोखण्यासाठी आतापर्यंत ‘इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचरने’ ठोस पावले उचलली आहेत. यातला एक उपाय म्हणून त्यांनी श्वान पथकातील काही खास कुत्र्यांना प्रशिक्षण देखील देण्यास सुरुवात केली आहे. या कुत्र्यांना सध्या स्कायडाईविंगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
आफ्रिकेच्या ज्या भागात हत्तींची संख्या जास्त आहे तिथे हेलिकॉप्टरच्या साह्याने गस्त घातली जाते. जर संशयित हालचाली निदर्शनास आल्या तर अशा तस्करांचा पाठलाग केला जातो. पण अशा वेळी हे तस्कर निसटून जाण्याची शक्यता अधिक असते, म्हणूनच कुत्र्यांना यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. गस्त घालताना जर संशयित हालचाली दिसल्या तर कुत्र्यांना लगेच हॅलिकॉप्टरमधून खाली सोडता येईल अशा प्रकारचे प्रशिक्षण त्यांना देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ‘परामाउंट तस्कर विरोधी संघटना’ आणि ‘के ९ अॅकॅडमी’चा हा व्हिडिओ आहे. या दोन्ही संघटना आफ्रिकेतील प्राण्याची तस्करी रोखण्यासाठी फॉरेस्ट रेंजर्सना प्रशिक्षण देतात.
आफ्रिका खंडात हत्तींची संख्या ही जास्त आहे. मोठे सुळे हे आफ्रिकी हत्तीचे वैशिष्ट्ये आहे. या सुळ्यांना काळ्या बाजारात करोडोंचा भाव मिळतो त्यामुळे आफ्रिकी हत्तीची अतिशय क्रुरपणे शिकार केली जाते. त्यामुळे अनेक प्राणीप्रेमी संघटनांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर हत्तींची शिकार आणि सुळ्यांच्या तस्करीचा मुद्दा प्रकाशझोतात आणला होता. त्यानंतरही शिकार रोखण्यासाठी कडक पावले उचलली गेली. दक्षिण आफ्रिकेने यासाठी ठोस पावले उचलत श्वान दलाला विशेष प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली.

Story img Loader