Monkey Cap Online Sale : हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण गरम कपडे घालतो. स्वेटर, कानटोपी, मफलर, हातमोजे, पायमोजे खरेदी करतो. माकड टोपीचा (मंकी कॅप) देखील लोक थंडीपासून संरक्षणासाठी वापर करतात. ही माकड टोपी ५० ते १५० रुपयांमध्ये खरेदी करता येते. परंतु आता लोक ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात. बऱ्याचदा दुकानांमधल्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत वस्तू ऑनलाईन मिळतात. तर काही वेळा दुकानामधल्या किंमतीपेक्षा ऑनलाईन खरेदीवेळी जास्त पैसे मोजावे लागतात. अशीच एक वस्तू ऑनलाईन पाहायला मिळाली आहे. या वस्तूची किंमत पाहून अनेकांना हुडहुडी भरू शकते
एका मंकी कॅपची म्हणजेच माकड टोपीची किंमत पाहून युजर्सना धक्का बसला आहे. लग्झरी ब्रॅन्ड डोल्से अँड गबानाच्या वेबसाईटवर डिस्काउंटनंतर एका मंकी कॅपची किंमत ३१,९९० रुपये इतकी झाली आहे. या मंकी कॅपची मूळ किंमत ४०,००० रुपये इतकी सांगण्यात आली आहे. यासह कंपनीने या टोपीचं नाव देखील बदललं आहे.
वेबसाईटकडून माकड टोपीचं मास्क कॅप असं नामकरण
वेबसाईटने माकड टोपीचं नाव बदलून या टोपीला मास्क कॅप अस नाव दिलं आहे. ही टोपी अगदी आपल्याकडे वापरल्या जाणाऱ्या माकड टोपीसारखीच आहे. खेडेगावांमध्ये अशा माकड टोपीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. लहान मुलं आणि आजोंबाकडे अशा टोप्या असतात. लोकप्रिय टीव्ही सिरीयल तारक मेहता का उल्टा चष्मा यामधील ‘बाबूजी म्हणजेच चंपकलाल’ हे पात्र अनेकदा माकड टोपीसह पाहायला मिळतं.
इतक्या पैशांमध्ये तर एखादी सेकेंड हँड बाइक येईल
एका युजरने ट्विटरवर डोल्से अँड गबानाच्या वेबसाईटवरील माकड टोपीचा फोटो आणि किंमत शेअर केली आहे. त्यावर अनेकांनी कमेंट करून वेबसाईटची थट्टा उडवली आहे. एका युजरने कमेंमध्ये लिहिलं आहे की ही टोपी बाबा-आजोबांच्या काळात फॅशन सिम्बॉल होती. तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, इतक्या पैशांमध्ये तर एखादी सेकेंड हँड बाइक मिळेल.