Dombivali Viral Video: लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याकडे झालेलं थोडसं दुर्लक्ष अनेकदा महागात पडू शकतं. बच्चेकंपनी खेळताखेळता काय करतील, याचा नेम नसतो. त्यामुळे तुमच्या घरी लहान मुलं असल्यास ही बातमी नक्की वाचणं गरजेचे आहे. कारण हल्ली धावपळीचं आयुष्य जगताना आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना डोंबिवलीतून समोर आली आहे. गेले दोन दिवस तिसऱ्या मजल्यावरून खाली पडलेलं बाळ चमत्कारीकरित्या कसं बचावलं याची चर्चा सुरू आहे अशातच आता ज्या व्यक्तीमुळे या बाळाचा जीव वाचला त्यानं त्यावेळी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
झालं असं की इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून एक २ वर्षांचा चिमुरडा खेळता खेळता खाली पडला अन् त्याचवेळी देवासारखा एक तरुण धावत येतो आणि त्याला वाचवतो. एखाद्या चित्रपटातला प्रसंग वाटावा अगदी तशीच घटना २५ जानेवारीला घडली आहे. डोंबिवलीतील देवीचापाडा परिसरात या भागात एक इमारत आहे, या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून एक दोन वर्षांचा मुलगा अचानक तोल गेल्याने खाली पडला. तो खाली पडताना त्याला त्याच भागात राहणाऱ्या भावेश म्हात्रेने पाहिलं. भावेश यांनी लगेच त्याच्या दिशेने धाव घेतली. आधी हा मुलगा त्यांच्या हातांवर आणि मग पायांवर पडला. या घटनेत दोन वर्षांच्या मुलाला दुखापत झाली आहे पण त्याचा जीव वाचला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असाच काहीसा प्रकार या ठिकाणी घडल्याची चर्चा आता लोक करत आहेत. सीसीटव्ही फुटेजमध्ये ही दृश्यं कैद झाली आहेत. इमारतीच्या बाहेर तीन ते चार माणसं बाहेर पडताना दिसतात. तेवढ्यात भावेश म्हात्रे धावत जातात आणि दोन वर्षांच्या या मुलाचा जीव वाचवतात ही दृश्यं सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
यानंतर भावेश म्हात्रे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. या घटनेबद्दल सांगताना ते सांगतात की, “मी इमारतीच्या खालून जात असताना वरुन मला आवाज आला आणि त्यादिशेने मी पाहिलं तर लहान बाळ पडत होता यावेळी क्षणाचाही विलंब न करता तसेच स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मी त्यादिशेने धाव घेतली आणि त्याला वाचवलं. हा चिमुरडा माझ्या हातावर आला आणि नंतर पायावर पडला. यात चिमुकला किरकोळ जखमी झालाय. मात्र सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. डॉक्टरांनीही हा चिमुकला ठीक असल्याचं सांगितलं आहे.”
पाहा व्हिडीओ
भावेश म्हात्रे यांचं होतं आहे कौतुक
डोंबिवलीतील देवीचापाडा परिसरात शनिवारी एक धक्कादायक घटना घडली. एका १३ मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडणाऱ्या या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा जीव भावेश म्हात्रे या तरुणाच्या धाडसामुळे वाचला. चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी जिवाची पर्वा न करता भावेशने केलेल्या प्रयत्नाची घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.