पिझ्झा म्हटलं की आपल्या तोंडाला नकळत पाणी सुटते. समोर आलेला गरमागरम पिझ्झा कधी एकदा फस्त करतो असे आपल्याला होऊन जाते. पण आपल्याला सुरक्षित राहता यावे यासाठी प्रतिकूल हवामानात जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांना मात्र समोर येईल ते खाऊन दिवस काढावा लागतो. याच सैनिकांचे काही क्षण आनंददायी व्हावेत यासाठी एका नामांकित पिझ्झा कंपनीने पुढाकार घेतला होता. देशातील सर्वात उंच आणि थंड ठिकाणच्या युद्धभूमीवर देशवासीयांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना डॉमिनोज या कंपनीने गरमागरम पिझ्झा पोहोचवला. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कंपनीने हा अनोखा उपक्रम राबवत सैनिकांना चेहऱ्यावर आनंद पसरवला.
विशेष म्हणजे इतक्या बर्फाळ आणि डोंगराळ भागात पिझ्झा पाठवण्यासाठी कंपनीने एक खास टीम तयार केली होती. उणे तापमान असलेल्या २० हजार फूटांवर गरमागरम पिझ्झा पाठवणाऱ्या कंपनीचे आणि तेथील कर्मचाऱ्यांचे या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. डॉमिनोजने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे याविषयी माहिती दिली आहे. “सियाचीनसारख्या ठिकाणी आपल्या देशाच्या रक्षणासाठी खडतर कष्ट घेणारे जवान आणि त्यांचे अधिकारी यांना आम्ही गरम पिझ्झा पोहचवू शकलो याचा आम्हाला आनंद आहे.” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. यामध्ये कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचे आणि येथील सैनिकांचे फोटोही अपलोड केले आहेत. या ट्विटर हँडलवर असंख्य प्रतिक्रिया आल्या असून लोकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
We are honoured to have served hot Domino’s pizzas to our brave Soldiers and Officers at Siachen as a gesture of our gratitude for their untiring service to the nation.#DominosinSiachen #Republicday2019 #Dominos pic.twitter.com/DhrwEjCekW
— dominos_india (@dominos_india) January 26, 2019
याठिकाणी तापमान इतके कमी असते की अनेकदा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सैनिकांना आपले प्राण गमवावे लागते. याठिकाणी कमरेपर्यंत बर्फ असल्याने सामान्य चालणेही अतिशय कठिण असते. अशा परिस्थितीत देशाचे रक्षण करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असलेल्या विशेष सैनिकांची भरती करण्यात येते.