ऑनलाइन शॉपिंग, कॅब बुकिंग किंवा ऑनलाइन फूड डिलिव्हरी अशा अनेक गोष्टींसाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागतो. अशा परिस्थितीत तुमच्या नंबरचा गैरवापरही होण्याची शक्यता असते. सध्या याचेच एक उदाहरण समोर आले आहे. ज्यामध्ये एका महिलेने ट्विटरच्या माध्यमातून तिच्या नंबरचा कसा गैरवापर करण्यात आला आहे, हे सांगितलं आहे. या महिलेबरोबर घडलेली घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरली आहे.
कनिष्ठा दधिची नावाच्या महिलेने सांगितले की, तिने डॉमिनोज पिझ्झामधून ऑनलाइन पिझ्झा ऑर्डर केला होता. ऑर्डर केल्याच्या दुसऱ्यादिवशी असं काही घडलं की कनिष्ठा घाबरुन गेली. तिने सांगितले, “पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला डिलिव्हरी बॉयचा मेसेज आला. त्यात त्याने लिहिलं होतं, “सॉरी, माझे नाव कबीर आहे, काल मी तुमच्या घरी पिझ्झा डिलिव्हरी करण्यासाठी आलो होतो. मी तोच आहे. मला तुम्ही खूप आवडता.”
दरम्यान, महिलेने या चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “मला विचारायचे आहे, डिलिव्हरी बॉयला यासाठीच पाठवले जाते का की, तो ग्राहकाच्या नंबर आणि पत्त्याचा गैरवापर करेल. जरी या मुलाला मी आवडत असले तरी कंपनीच्या माध्यमातून फोन नंबरचा गैरवापर करणे योग्य आहे का?”
एकाट मुलाची वेगवेगळी नावे?’
महिलेने तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याची डॉमिनोजशी संबंधित चॅट्सचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. तसेच तिने सांगितले की, चॅटवर त्याचे नाव कबीर आहे आणि डॉमिनोज स्टोअरमध्ये मन्नू आहे, तर ईमेलमध्ये त्याचे नाव कबीर बबलू असे आहे. त्यामुळे हा मुलगा वेगवेगळ्या नावांनी काय करत आहे हे तुम्ही समजू शकता. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील असून महिलेच्या ट्विटला उत्तर देताना हेल्पलाइन क्रमांक ११२ ने महिलेला मदतीचे आश्वासन दिले आहे.
डिलिव्हरी बॉयची माहिती देण्यास डॉमिनोजचा नकार –
कनिष्ठाने अधिकार्यांबरोबर केलेल्या संवादाचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि “धन्यवाद” असे लिहून कृतज्ञता व्यक्त केली. शिवाय डॉमिनोजने त्यांच्या डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हबद्दल माहिती शेअर करण्यास नकार दिल्याचंही तिने सांगितलं. शिवाय डिलिव्हरी बॉयची माहिती न दिल्याने हे प्रकरण वाढले असून कायदेशीर कारवाई करण्यासाठी ती ग्राहक न्यायालयात दाद मागणार आहे.