Dominos Pizza Shop Disgusting Video : पिझ्झाचे नाव ऐकताच लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. त्यामुळे पिझ्झा हे अनेकांच्या आवडीचे फास्ट फूड बनला आहे. पिझ्झा खायला आवडणारे लोक तर डॉमिनोज पिझ्झा नक्कीच आवडीने खात असतील. अनेक जण तर असे आहेत की, ज्यांना फक्त ‘डॉमिनोज’चाच पिझ्झा खायला खूप आवडते. पण, आम्ही तुम्हाला डॉमिनोज आउटलेटवरील असा एक व्हिडीओ दाखवणार आहोत, जो पाहिल्यानंतर तुम्ही तुमची निवड बदलाल आणि ‘डॉमिनोज’मधून पुन्हा ऑनलाइन पिझ्झा ऑर्डर करताना १०० वेळा विचार कराल.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर जे लोक ‘डॉमिनोज’ पिझ्झा आवडीने खातात, त्यांचे डोळे उघडतील. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक डॉमिनोज आउटलेट आहे, जिथे एक कर्मचारी चक्क कचऱ्यात फेकून दिलेले पिझ्झाचे बॉक्स गोळा करताना दिसतोय. तो चक्क कचऱ्याच्या डब्ब्यातील काळ्या पिशवीत हात घालून एकेक बॉक्स उचलतोय आणि ते टिश्यू पेपरने स्वच्छ करून एका बाजूला ठेवतोय. हे दृश्य पाहून व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती हे कृत्य चुकीचे असल्याचे म्हणतेय. पण, तरीही तो कर्मचारी आपले काम सुरूच ठेवतो. कर्मचाऱ्याचा हा घृणास्पद प्रकार पाहून आता अनेक जण संताप व्यक्त करीत आहेत.
कारण- डॉमिनोझ हा खूप मोठा पिझ्झा ब्रँड आहे, ज्याचे जगभरात अनेक आउटलेट्स आहेत. जिथून पिझ्झाप्रेमी आवडीने आणि तितक्यात विश्वासाने पिझ्झा ऑर्डर करतात. पण, या आउटलेटमधील काही कर्मचारी खुलेआमपणे ग्राहकांच्या जीवाशी खेळताना दिसतायत. त्यामुळे डॉमिनोज पिझ्झाच्या गुणवत्तेवर आता विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न अनेकांना पडलाय.
डॉमिनोज आउटलेटमधील हा धक्कादायक व्हिडीओ @dr.rajveersaini नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करीत संताप व्यक्त करीत आहेत. एका युजरने लिहिले की, हे तर काहीच नाही. जिथे पिझ्झा बनवतात तिथे यापेक्षा घाणेरडेपणा असतो. दुसऱ्याने लिहिले की, म्हणून जेपण खायचं असेल, ते घरी बनवून खा. तिसऱ्याने ग्राहकांना सल्ला दिला की, यापुढे पिझ्झा खाऊन झाल्यानंतर बॉक्स फाडून कचऱ्याच्या डब्ब्यात फेका; जेणेकरून तो परत वापरला जाणार नाही. तर, अनेकांनी या प्रकरणी डॉमिनोज पिझ्झाला टॅग करून जाब विचारला आहे.