अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या वादग्रस्तांसाठी कायमच चर्चेत असतात. असेच एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी पुन्हा एकदा केले आहे. अमेरिकेच्या किनारपट्टीवर धडकणाऱ्या चक्रीवादळांना थांबवण्यासाठी ही चक्रीवादळं किनारपट्टीला धडकण्याआधीच त्यावर अणुबॉम्ब टाकण्याचा सल्ला ट्रम्प यांनी दिला आहे. ‘वादळांच्या डोळ्यात (केंद्रभागी) अणुबॉम्ब टाकून आफ्रीका खंडाजवळच्या समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची निर्मिती थांबवता येईल का?’ अशी विचारणा ट्रम्प यांनी केल्याचे ‘अॅक्सीओस’ या अमेरिकन वेबसाईटने दिले आहे.
‘अॅक्सीओस’ने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांनी चक्रीवादळांची निर्मिती थांबवण्यासाठी अणुबॉम्ब वापरण्याचा सल्ला दिल्यानंतर उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यावर काय मत व्यक्त करणार असा विचार सर्वचजण करत होते असं या वेबसाईटने म्हटलं आहे.
चक्रीवादळं थांबवण्यासाठी अशाप्रकारचा जगावेगळा उपाय सुचवण्याची ट्रम्प यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी २०१७ मध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ‘चक्रीवादळं किनारपट्टीला धडकण्याआधीच त्यावर अणुबॉम्ब टाकता येईल का?,’ अशी विचारणा केली होती. मात्र ट्रम्प यांनी अशाप्रकराचे कोणतेही मत व्यक्त केले नाही असे स्पष्टिकरण व्हाइट हाऊसने दिले आहे. तरी अॅक्सीओसशी बोलताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ट्रम्प यांच्या कल्पनेमागील विचार चुकीचा नाहीय’ असं मत व्यक्त केलं आहे.
Scoop: Trump suggested nuking hurricanes to stop them from hitting U.S. https://t.co/qy3H1avs8l
— Jonathan Swan (@jonathanvswan) August 25, 2019
चक्रीवादळांच्या केंद्रस्थानी अणुबॉम्ब टाकण्याची कल्पना काही नवीन नाही. याआधी १९५० च्या दशकात अमेरिकेमध्ये सरकारसाठी काम करणाऱ्या वैज्ञानिकांनीही असा सल्ला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डिवाइट आयझीनहॅवर यांना दिला होता. चक्रीवादळाच्या डोळ्यामध्ये (केंद्रभागी) अणुबॉम्ब टाकून काहीच फायदा होणार नाही असं शास्त्रज्ञांनी वेळोवेळी स्पष्ट केले असले तरी ही कल्पना अनेकदा मांडण्यात आली आहे. मात्र चक्रीवादळामध्ये अणुबॉम्ब टाकल्यास वादळ जमीनीवर धडकल्यास त्यामधून किरणोत्सर्ग होईल असे वैज्ञानिक सांगतात.