अमेरिकन निवडणुकांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतले बारा कोटी नागरीक आज आपल्या ४५ व्या राष्ट्राध्यक्षाची निवड करतील. राष्ट्राध्यक्ष पदासाठी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्यात चुरशीची लढत आहे. काही तासांत अमेरिकेला भावी राष्ट्राध्यक्ष मिळेल. या दोघांपैकी एकाचीही निवड झाली तरी नवा इतिहासच घडेल त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांचे लक्ष या निवडणुकांकडे लागले आहे. यात हिलरी निवडुन येतील की ट्रम्प  याबद्दल अनेक तर्क वितर्क अभ्यासकांनी मांडले आहे. ही निवडणुक जरी दूर अमेरिकेत लढली जात असली तरी हिलरी आणि ट्रम्प या दोघांनाही भारतातील अनेकांकडून समर्थन दिले जात आहे. ट्रम्प यांचे भारतीयांकडे असलेले झुकते माप  हे सर्वज्ञात आहे. त्यातूनच या निवडणुकीचे रंग भारतातही पाहायला मिळाले.

चेन्नईमधल्या चाणक्य माशाने तर अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष कोण होणार याविषयी भाकित वर्तवले आहे. या माशाने पाण्यातील ट्रम्प यांचा फोटो उचलून धरला त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हेच राष्ट्राध्यक्ष होतील अशी चर्चा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या माशाने याआधीही २०१५ च्या वर्ल्ड कपचे भविष्य वर्तवले होते. सेमी फायनलमध्ये न्यूझीलँडचा संघ धडक देईल असे भविष्य त्याने वर्तवले होते. विशेष म्हणजे त्यावेळी त्याचे भविष्य अचूक ठरले होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाला पराभूत करेल हे देखील त्याचे भविष्य खरे ठरले होते. त्यामुळे चाणक्य माशाने वर्तवलेले भाकित यावेळी  देखील खरेच ठरणार अशी अनेकांना आशा आहे. ट्रम्प यांना मोठ्या प्रमाणात भारतीयांकडून पाठिंबा मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्या विजयासाठी मुंबईतील साईधाम मंदिरात तब्बल तीन तास होमहवन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी हिंदू सेनेने जंतर मंतर येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन केले होते. हिंदू सेनेचे शेकडो कार्यकर्ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ बॅनर घेऊन रस्त्यावर उतरले होते. याशिवाय जुलैमध्ये हिंदू सेनेच्याच उत्साही कार्यकर्त्यांनी ट्रम्प यांचा वाढदिवसही साजरा केला होता. चाणक्याने ट्रम्प याच्या विजयाचे भविष्य वर्तवल्यानंतर भारतातील ट्रम्प समर्थकाने एकच जल्लोष केला.