पाकिस्तानातील एका न्यायालयानं जुगार खेळण्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या एका गाढवाला जामीन दिल्याची घटना घडली आहे. आरोपी गाढवाला चार दिवस पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार गाढवाला सोडून दिलं. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रहिम यार खान प्रांतात शनिवारी पोलिसांनी या गाढवाला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांच्या या निर्णयाचं हसूही झालं होतं.

जुगार खेळण्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठ जणांना एका दिवसानंतरच सोडण्यात आलं. परंतु गाढवाला मात्र पोलिसांनी चार दिवस पोलीस स्थानकाबाहेर बांधून ठेवलं होतं. लोकांनी हे गाढव ४० सेकंदात ६०० मीटर धावू शकतं की नाही यावर सट्टा लावला होता. त्यानंतर गाढवासह सर्वांना अटक करण्यात आली. गाढवाला करण्यात आलेल्या अटकेची जगभरात चर्चा करण्यात आली. तसंच अनेक माध्यमांनीही यासंदर्भात पोलिसांशी संवाद साधला. तसंच सोशल मीडियावरही याची चर्चा सुरू होती.

यादरम्यान गाढवाला केवळ ४ दिवस बांधून ठेवण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आबे. न्यायालयानं यात हस्तक्षेप करत गाढवाचे मालक गुलाम मुस्तफा यांना गाढव परत करण्याचे पोलिसांना आदेश दिले होते. तसंच या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत गाढवाला सुरक्षित ठेवण्याचे आदेशही देण्यात आले होते.

अन्य लोकांसह या गाढवाचं नावंही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळेच हे गाढव पोलीस ठाण्याबाहेर बांधून ठेवण्यात आल्याची माहिती रहिम यार खान प्रांताचे एसएचओंनी दिली. पोलिसांनी या जुगाऱ्यांकडून १ लाख २० रूपयांची रक्कम जप्त केली. पोलिसाचा गाढवाला अटक करण्याचा निर्णय सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनला आहे.

Story img Loader