खाण्यापिण्याची खरी मजा फक्त स्ट्रीट फूडमध्येच येते. येथे दुकानदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक पद्धती अवलंबतात. काही जण सेवा देण्याची नवीन पद्धत घेऊन येतात, तर काही नवीन प्रयोग करुन पदार्थाला नवीन चव देतात. दक्षिण भारतीय डिश डोसा या रेसिपीवर बरेच प्रयोग केले जात आहेत. तुम्हीही अनेक प्रकारचे डोसे खाल्ले असतील. सध्या #ChocolateDosa सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. याचं कारण या डोसाच्या नावातच लपलेलं आहे. पण, लोकांना ते फारसं काही आवडलेलं नाहीये. चॉकलेट डोसाचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून खवय्यांची तळपायाची आग मस्तकात गेलीये.
आतापर्यंत तुम्ही डोसा बनवताना त्यावर बटाटा, पनीर, चिकन भरताना बऱ्याचदा पाहिलं असेल… पण तुम्ही कधी डोसामध्ये आईस्क्रीम भरताना पाहिलंय का? होय. हे खरंय. डोसा प्रेमींना आणखी नवी चव चाखता यावी यासाठी आता चॉकलेट डोसा या नव्या रेसिपीचा शोध लावण्यात आलाय. डोशाचं हे अनोखं रूप त्याची चव कल्पना करूनच हैराण करणारी आहे. विचार कर मग ती प्रत्यक्षात कशी असेल?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तव्या असलेल्या डोशावर आईस्क्रीमचा स्कूप, वरुन चॉकलेट सीरपची धार आणि त्यावर किसलेलं चॉकलेट टाकून हे सर्व सारं काही भरलं जातंय. डोशावर हे सर्व मिश्रण शिजल्यानंतर त्याचे रोल कापून हा चॉकलेट डोसा सर्व्ह केला जातो. सोशल मीडियावर हा चॉकलेट डोसा चर्चेचा विषय ठरलाय.
या चॉकलेट डोशाचा व्हिडीओ ट्विटरवर @vijay sheth नावाच्या हँडलवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक डोशाच्या नव्या प्रकारच्या रेसिपीवर अक्षरश: चिडले आहेत. खरं तर बरेच युजर्स डोसाच्या रेसिपीवर समाधानी नाहीत. कोणी म्हणत आहे की पारंपारिक डोसा उध्वस्त झाला आहे. तर कोणी म्हणत आहे की हा डोसा बनवत आहे की चॉकलेट केक बनवत आहे. एका युजर्सने विनोदाने या नव्या रेसिपीचा शोध लावणाऱ्याला अटकेची मागणी केली आहे. तर, दुसऱ्या युजर्सनेही मजेशीर टिप्पणी केली आणि त्याने लिहिले की निर्दोष डोसाच्या हत्येची सीबीआय चौकशी व्हायला हवी. चॉकलेट डोशाच्या रेसिपीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्सनी तर पारंपारिक डोशाला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
तुम्हाला काय वाटत या व्हिडीओबदल?