एखादी पैज किंवा स्पर्धा जिंकून बक्षीस मिळवण्याच्या नादात अनेक लोकं भलतं धाडस करतात. जे कधी कधी खूप धोकादायक आणि जीवघेणं ठरु शकतं. शिवाय अशा धोकादायक स्पर्धांमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना आपण याआधीही सोशल मीडियावर पाहिल्या आहेत. सध्या अशीच एक घटना उघडकीस आली आहे, ज्यामध्ये स्पर्धेत २ लाख रुपये जिंकण्याच्या नादात एका व्यक्तीने आपला जीव गमावला आहे.
२ लाखांसाठी गमावला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, झांग नावाच्या व्यक्तीने दारू पिण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता, ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला २ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार होते. साउदर्न मेट्रोपोलिस डेलीने वृत्त दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना चीनमधील असून येथील मृत झांग हा आग्नेय ग्वांगडोंग प्रांतातील शेन्झेन येथील एका कंपनीत काम करत होता. कंपनीच्या एका टीम बिल्डिंग डिनरसाठी तो गेला होता. या वेळी झांगच्या बॉसने रात्रीच्या जेवणादरम्यान दारू पिण्याची स्पर्धा आयोजित केली. यावेळी बॉसने घोषणा केली की, जो कोणी झांगपेक्षा जास्त दारू पिणार त्याला २० हजार युआन म्हणजे जवळपास २ लाख २८ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच ही स्पर्धा झांगने जिंकली तरी त्याला ही रक्कम दिली जाईल. मात्र या स्पर्धेत जो हरेल त्याला कंपनीतील कर्मचाऱ्यांना १० हजार युआन किमतीचा चहा पाजावा लागेल असंही त्याच्या बॉसने सांगितलं आणि यानंतर स्पर्धेला सुरू झाली.
हेही पाहा- जंगलात व्हिडीओ शूट करतानाच व्यक्तीच्या अंगावर पडली वीज; थरारक घटनेचा VIDEO होतोय व्हायरल
१० मिनिटांत एक लिटर दारु प्यायला अन्,,, –
यानंतर झांगने त्याच्या ड्रायव्हरसह अनेक कर्मचाऱ्यांची निवड केली, यातील एका स्पर्धकाने सांगितले की, झांगने जिंकण्यासाठी १० मिनिटांत सुमारे एक लिटर स्ट्रॉंग चायनीज बैज्यू स्पिरिट नावाची दारु प्यायली. ज्यामुळे तो जागीच कोसळला. झांग जमीनीवर पडताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला गंभीर मद्य विषबाधा आणि न्यूमोनिया झाल्याचे सांगितले. शिवाय यावेळी त्याला जास्त त्रास होत होता. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही शेवटी त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
स्पर्धेमुळे कंपनी बंद –
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी कंपनी बंद करण्यात आली. कंपनीच्या WeChat ग्रुपच्या प्रतिनिधीने सांगितले की, “जेवणाच्या वेळी झालेल्या प्रकारामुळे कंपनी अधिकृतपणे बंद करण्यात आली आहे.” तर या प्रकरणाचा पुढील तपास सध्या शेन्झेन पोलीस करत असल्याचं सांगण्यात येत आहे.