Driverless Burning Car Video : राजस्थानच्या जयपूरमधून एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. येथे एका चालत्या कारला अचानक आग लागली. पण, आगीने पेटलेली ही कार न थांबता रस्त्यावर तशीच धावत राहिली. यावेळी पेटती कार पाहून जीव वाचवण्यासाठी लोक धावत आहेत. यावेळी कारच्या पुढे असलेली वाहनं पटकन बाजूला होताना दिसतायत. या घटनेत कार चालकाने हँडब्रेक ओढून कारमधून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला, त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या भयानक घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ही घटना जयपूर एलिव्हेटेड रोडवरील अजमेर ते सोडाला जाणाऱ्या रस्त्यावर घडली. अचानक एका धावत्या कारने पेट घेतला, यावेळी अर्धा किलोमीटरपर्यंत ही कार चालकाशिवाय धावत राहिली. याचदरम्यान कारने काही दुचाकींनाही धडक दिली, त्यामुळे रस्त्यावर उपस्थित इतर लोक आपली वाहने वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसत आहेत.
काही दुचाकीचालक चक्क आपली दुचाकी सोडून पळून जाताना दिसले. कारला आग लागल्याचे पाहून चालकाने हँडब्रेक ओढून जीव वाचवण्यासाठी उडी मारली, मात्र तरीही कार थांबली नाही.

घटनेबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मानसरोवरच्या पत्रकार कॉलनीत राहणारे जितेंद्र जांगीड अजमेर कल्व्हर्टवरून त्यांची कार चालवत होते, पण कार चालवत असताना अचानक कारच्या एसीमधून धूर येऊ लागला. काही क्षणात आगीचा भडका उडाला आणि सर्वत्र धूर पसरू लागला. त्यानंतर जितेंद्र यांनी संपूर्ण प्रकरण लक्षात घेऊन कारचा हँडब्रेक ओढला आणि उडी मारली. यावेळी आजूबाजूच्या लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग वेगाने पसरू लागली.

टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांनी रतन टाटांना वाहिली अनोखी श्रद्धांजली! श्वानाची ‘ती’ कृती पाहून उपस्थितही झाले भावूक; हृदयस्पर्शी VIDEO व्हायरल

अशाप्रकारे एलिव्हेटेड रोडच्या उतारावर कार चालकाविना पुढे जाऊ लागली, वाटेत एक बाईक उभी होती, तिला धडक देत कार पुढे गेली आणि सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत जळत धावत राहिली. शेवटी कार दुभाजकाला धडकली आणि थांबली. कार थांबल्यानंतरही आग विझवण्याचे प्रयत्न सुरूच होते. मात्र, लोकांना यश आले नाही. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली असून त्यात ठेवलेले सामानही राख झाले. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसून मोठी दुर्घटना टळली.

रस्त्यावर सुसाट धावतेय आगीने पेटती कार

या बर्निग कारच्या घटनेमुळे घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती, पण पोलिसांनी ती कार रस्त्यावरून हटवली असून चालकांना रस्ता मोकळा करून दिला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Driverless burning car speeds through jaipur streets a causes panic shocking video goes viral sjr