आतापर्यंत तुम्ही नशेत धुंद असलेल्या तरुणांना धुमाकूळ घालताना पाहिलं असेल मात्र तुम्ही कधी पक्ष्यांना नशेत धुमाकूळ घालताना पाहिलंय का? ऐकायला नवल वाटेल अशी घटना सध्या अमेरिकेतल्या गिलबर्ट शहरात घडली आहे.
चेडर वॅक्स विंग आणि अन्य काही स्थानिक पक्षी नशेच्या अंमलाखाली असल्याचं गिलबर्ट पोलिसांनी म्हटलं आहे. पक्षी खिडक्या, गाड्यांना येऊन धडकत आहेत. काही पक्षी सुस्तावलेल्या स्थितीत रस्त्याच्या कडेला पडलेले दिसत आहेत, तर काही उडताना संभ्रमात दिसत आहे. यापूर्वी पक्ष्यांच्या वागणूकीत अशा प्रकारचा बदल कोणीही पाहिला नव्हता. त्यामुळे काळजीत पडलेल्या नागरिकांनी पक्ष्यांच्या वागणूकीत विचित्र बदल झाला असल्याचं निरीक्षण पोलिसांकडे नोंदवलं आहे.
गिलबर्ट पोलिसांचे मुख्य अधिकारी टेचर यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षी हे नशेच्या अंमलाखाली आले असल्याचं समजत आहे. जेव्हा कडाक्याची थंडी पडते तेव्हा बेरीसारख्या फळांमधला ओलावा हळूहळू कमी होत जातो. ओलावा कमी झाल्यानं फळांत असलेल्या शर्करेची किण्वन प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे अशाप्रकारे किण्वन प्रक्रिया पार पडलेली फळं खाल्ल्यानंतर पक्ष्यांना नशा चढायला सुरूवात होते. सगळ्याच पक्ष्यांना ही नशा चढत नाही. जे पक्षी वयानं लहान आहेत त्या पक्ष्यांनाच प्रौढ पक्ष्यांच्या तुलनेत जास्त त्रास होतो अशी माहिती पोलिसांनी दिली. सध्या वातावरणात अनपेक्षितरित्या लवकर झालेल्या बदलामुळे बेरीज् या फळामध्ये किण्वन प्रक्रिया सुरू झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मात्र यात काळजी करण्याचं काहीही कारण नसून नशेचा प्रभाव कमी झाल्यावर पक्ष्यांची वर्तणूक नक्कीच बदलेल तोपर्यंत त्यांची काळजी घ्या, त्यांना कोणतीही इजा पोहचवू नका अशी विनंतीही पोलिसांनी स्थानिकांना केली आहे.