दारुच्या नशेत लोक काय करतील, याचा काही नेम नाही. दारुच्या नशेत आपण काय करतोय याचं अनेकांना भान राहात नाही असं म्हटलं जातं. त्यावर खुद्द मद्यसेवन करणारी काही मंडळी नकार देतात किंवा काही त्याचा स्वीकार करतात. पण याचा ढळढळीत पुरावा देणारा एक धक्कादायक प्रकार केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दारुच्या नशेत एक व्यक्ती गळ्यात अजगर घेऊन आपला फोटो काढण्याची विनंती पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांना करत होती!
नेमकं घडलं काय?
फ्री प्रेस जर्नलनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. एका पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यानं यासंदर्भातला सगळा प्रकार सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे. या कर्मचाऱ्याचं नाव अभिषेक असून गळ्यात अजगर घेऊन फोटो काढायला आलेल्या महाभागाचं नाव चंद्रन असल्याचंही वृत्तात नमूद केलं आहे. दोन दिवसांपूर्वीचा हा प्रकार असल्याचं सांगितलं जात आहे.
अभिषेकनं दिलेल्या माहितीनुसार, “चंद्रन त्या दिवशी पेट्रोल पंपावर आला तेव्हा त्याच्या गळ्याभोवती एका अजगराचा विळखा होता. पण त्याला त्याचं काहीही सोयरसुतक नव्हतं. जणूकाही गळ्यात हार घातल्या अशा आविर्भावात चंद्रन आला आणि त्यानं आम्हाला त्याचा तशा अवस्थेत फोटो काढायला सांगितलं. तो दारुच्या नशेत होता. त्यामुळे कदाचित आपण नेमकं काय करतोय, याचं गांभीर्य व संभाव्य गंभीर परिणामांची त्याला कल्पना नसावी. पण हळूहळू त्या अजगरानं चंद्रनच्या गळ्याभोवतीचा आपला फास आवळायला सुरुवात केली”.
बापरे! तोंड उघडलं, बॉटल घेतली अन् सापाला ढसाढसा पाजली दारू; मद्यपी तरुणांचा VIDEO व्हायरल
“मी धावत जाऊन एक मोठी पिशवी आणली, तोपर्यंत..”
हा सगळा प्रकार पाहून अभिषेक चांगलाच धास्तावला. तो म्हणाला, “मी आयुष्यात कधीच साप किंवा अजगर पाहिला नव्हता. पण तेव्हा अजगरानं चंद्रनच्या गळ्याभोवतीचा फास आवळला आणि तो तोल जाऊन खाली पडला. मी धावच जाऊन अजगराला पकडण्यासाठी एक मोठी पिशवी आणली. तोपर्यंत अजगरानं फास चांगलाच घट्ट केला होता. चंद्रन दारूच्या नशेत असल्यामुळे त्याला काहीच करता येत नव्हतं. मी कसंबसं त्या अजगराच्या शेपटाकडचा भाग जोर लावून ओढला आणि त्याच्या गळ्याभोवतीचा फास सैल झाला”.
“चंद्रनला एका हातानं उचलून त्या अजगराला शेपटाकडे धरूनच मी मोकळं केलं. पकड सैल होताच अजगर सरपटत बाजूच्या ट्रकच्या खाली निघून गेला”, असं अभिषेकनं सांगितल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा चंद्रनला उचलून कर्मचाऱ्यांनी उभं केलं, तेव्हा जणूकाही झालंच नाही, अशा आविर्भावात तो मागे वळून अजगर गेला त्या दिशेनं पाहात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.