बरेचदा लोक अधिक मौजमजा करण्याच्या नादात सर्व मर्यादा ओलांडतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत असून तो पाहून तर अंगावर काटा येतो. हा प्रकार क्रूझवर पाहायला मिळाला. एका क्रूझवर प्रवाशाने इतकी दारू प्यायली की त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो समुद्रात पडला. दारूच्या नशेत तो अचानक समुद्रात पडला. मात्र, त्यानंतर जे घडले तो चमत्कार होता. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
‘असा’ पडला समुद्रात
मेक्सिकोच्या आखातातील २८ वर्षीय तरुण बुधवारी रात्री आपल्या बहिणीसोबत कार्निव्हल व्हॅलर जहाजावरील एका बारमध्ये गेला होता, परंतु शौचालयात गेल्यानंतर तो परत आला नाही. त्याच्या बहिणीने सांगितले की, त्याने खूप दारू प्यायली होती. नंतर त्याला शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. अनेक बचाव कर्मचार्यांनी या भागात शोध घेतला आणि अखेरीस गुरुवारी संध्याकाळी लुईझियानाच्या किनार्यापासून सुमारे २० मैल (३० किमी) अंतरावर हा माणूस दिसला.
(आणखी वाचा : अन् लग्नाच्या विधीदरम्यान नवरदेवानं केलं ऑफिसचं काम! फोटो व्हायरल होताच नेटकरी म्हणाले, “वर्क फ्रॉम होम…”)
१५ तासांहून अधिक काळ समुद्रात अन् झाला चमत्कार
मेक्सिकोच्या आखातातील क्रूझ जहाजातून बेपत्ता झालेल्या या प्रवाशाला १५ तासांहून अधिक काळ समुद्रात राहिल्यानंतर वाचवण्यात यश आले आहे. अमेरिकेच्या तटरक्षक दलाने ही माहिती दिली. यूएस कोस्ट गार्डचे लेफ्टनंट सेठ ग्रॉस यांनी सांगितले की, हा माणूस १५ तासांपेक्षा जास्त काळ पाण्यात राहिला. हा चमत्कार आहे. ग्रॉसने सीएनएनला सांगितले की, त्याने आपल्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत असा प्रसंग पहिल्यांदाच पाहिला होता. आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.