चांगलं काम कितीही छोटं असलं तरी त्याची दखल घेतली जाते असं म्हणतात. मात्र दुबईमधील एका फूड डिलेव्हरी बॉयला या म्हणीचा प्रत्यक्ष प्रत्यय आला जेव्हा थेट दुबईच्या राजकुमाराने त्याचं कौतुक केलं. सोशल मीडियावर या डिलेव्हरी बॉयने केलेल्या एका चांगल्या कामाचा छोटासा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर थेट दुबईच्या राजकुमाराने त्याच्या कामाची दखल घेत या डिलेव्हरी बॉयला लवकरच भेटण्याचं आश्वासन दिलंय.
नक्की वाचा >> चार काळी वर्तुळं असणाऱ्या ‘या’ ‘ट्रॅफिक साइन’चा अर्थ तुम्हाला माहितीय का? सोशल मीडियावरील चर्चेनंतर पोलिसांनीच दिलं उत्तर
दुबईचे राजकुमार हमदान बिन मोहम्मद अल मख्तुम यांनी ट्विटरवरुन हा व्हिडीओ शेअर करत या डिलेव्हरी बॉयचं कौतुक केलं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांची वरदळ असणाऱ्या एका चौकामध्ये रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या दोन मध्यम आकाराच्या काँक्रिटच्या विटा या डिलेव्हरी बॉयने उचलून बाजूला केल्या. सिग्नलवर गाडीत बसलेल्या एका व्यक्तीने हा सारा प्रकार गाडीमधून मोबाईल कॅमेरात कैद केला. हा व्हिडीओ मागील काही दिवसांपासून दुबईमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या तरुणाने या विटा बाजूला काढल्याने मोठा अपघात होण्यापासून वाचल्याने अनेकांनी त्याचं कौतुक केलं असून त्यामध्ये आता थेट दुबईच्या राजकुमाराचाही समावेश झालाय.
‘तालाबा’त या कंपनीसाठी हा फूड डिलेव्हरी बॉय काम करतो. सिग्नलवर थांबला असता त्याला चौकात दोन विटा पडलेल्या दिसल्या. या विटांमुळे एखाद्या गाडीचा अपघात होऊ शकतो असं वाटल्याने त्याने गाडी सिग्नलवरच उभी करुन या विटा उचलून फुटपाथवर ठेवल्या. हा व्हिडीओ शेअर करत दुबईच्या राजकुमाराने, “दुबईमधील या चांगूलपणाच्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. कोणी मला ही व्यक्ती कोण आहे सांगू शकेल का?” अशा कॅप्शनसहीत दुबईच्या राजकुमाराने हा व्हिडीओ शेअर केलेला.
आता ४६ लाखांहून अधिक फॉलोअर्स असणाऱ्या देशाच्या राजकुमारानेच थेट या व्यक्तीची ओळख पटवण्यासंदर्भात विचारणा केल्यानंतर अवघ्या काही मिनीटांमध्ये ही व्यक्ती कोण आहे याबद्दलची माहिती समोर आली. या तरुणाचे नाव अब्दुल गफूर असल्याचं समजलं. यानंतर दुबईच्या राजकुमाराने मूळ ट्विटनंतर अर्ध्या तासाने पुन्हा एक ट्विट केलं. “तो भला माणूस कोण आहे हे समजलं. धन्यवाद अब्दुल गफूर. तू फार दयाळू आहेस. लवकरच आपण भेटूयात,” असं दुबईच्या राजकुमाराने अब्दुलचा फोटो शेअर करत म्हटलं.
खलीज टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर दुबईच्या राजकुमाराने स्वत: या डिलेव्हरी बॉयला फोन केला आणि या छोट्या कृतीसाठी त्याचे आभार मानले. “मला माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता,” असं अब्दुलने या संभाषणाबद्दल विचारलं असता सांगितलं. जेव्हा मला राजकुमारांचा कॉल आला तेव्हा मी फूड डिलेव्हरीसाठी बाहेर पडलो होतो असंही अब्दुल म्हणाला. “दुबईच्या राजकुमारांनी मी केलेल्या त्या छोट्याश्या कृतीसाठी माझे आभार मानले. सध्या आपण देशाबाहेर आहोत. मात्र परत आल्यावर मी नक्की तुझी भेट घेईन, असंही ते मला म्हणाले,” अशी माहिती अब्दुलने दिली.
राजकुमारांनी व्हिडीओ ट्विट केल्यानंतर काही मिनिटांमध्ये मला दुबई पोलिसांचा कॉल आला होता. त्यांनी माझ्याकडून आधी सर्व माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी मला राजकुमारांना तुझ्याशी बोलायचं असल्याचं सांगितलं, असंही अब्दुल म्हणाला. थेट राजकुमाराने दखल घेतल्यानंतर अब्दुलच्या कंपनीनेही त्याला त्याच्या मायदेशी म्हणजे पाकिस्तानमध्ये जाऊन कुटुंबाला भेटून येण्यासाठी विमान प्रवासाचा खर्च भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात घरी कधी जाणार असं विचारलं असता अब्दुलने हसत “आता राजकुमारांची भेट घेतल्यानंतरच जाणार,” असं उत्तर दिलं.