तशी दुबईची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. अगदी या जागेला भेट न देणाऱ्यांनाही दुबईची महती आहे. जगातील सर्वात उंच इमारत असणारी बुर्ज खलिफा याच शहरात आहे. त्याप्रमाणे ‘बुर्ज अल अरब’ सारखे आगळेवेगळे संग्रहालयही पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. आता समोर आलेल्या एका वृत्तानुसार दुबईमध्ये आता एक आलिशान रिसॉर्ट उभारण्यात येणार असून हे रिसॉर्ट चंद्राच्या थीमवर आधारीत असणार आहे. या रिसॉर्टचे काही कनसेप्ट बेस फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
दुबईमधील हे चंद्रसारखं दिसणारं रिसॉर्ट उभारण्यासाठी जवळजवळ ५ बिलियन अमेरिकी डॉलर्स खर्च केले जाणार आहेत. भारतीय चलनामध्ये ही रक्कम तब्बल ४० हजार कोटी इतकी होते. ‘अरेबियन बिझनेस’ने दिलेल्या वृत्तानुसार हे रिसॉर्ट उभारण्याचं काम कॅनडामधील ‘मून वर्ल्ड रिसॉर्ट्स इंटरनॅशनल’ ही कंपनी करणार आहे. ही इमारत ७३५ फूट उंच असणार आहे. पुढील चार वर्षांमध्ये ही इमारत बांधून पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या रिसॉर्टमध्ये सर्व आधुनिक सोयी सुविधा असतील. यात स्पा सेंटर, नाईट लाइफसाठी विशेष सेक्शन्सही असतील. या रिसॉर्टमधील मुख्य मार्ग हा गोलाकार असणार आहे. या रिसॉर्टमध्ये दरवर्षी २५ लाख पर्यटक भेट देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या रिसॉर्टच्या इमारतीमधील सर्वात वरच्या मजल्यावरील २३ टक्के जागा ही कसिनोसाठी असेल. नऊ टक्के जागा ही नाईटक्लब्ससाठी तर हॉटेल्ससाठी ४ टक्के जागा राखीव ठेवली जाणार आहे. या रिसॉर्टच्या गच्चीचा एक तृतियांश भाग हा बीच क्लबसाठी वापरला जाणार आहे. उतरेला एक तृतीयांश भाग हा लगूनसाठी आणि चार टक्के भागावर अॅम्पीथेअटर बांधलं जाणार आहे.
संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमधील पर्यटनाला सध्या सुगीचे दिवस आहेत. “आमच्या देशातील पर्यटनासंदर्भातील आर्थिक उलाढालीने २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये १९ बिलीयन द्राम्सचा (५.२ बिलियन अमेरिकन डॉलर्सचा) टप्पा ओलांडला आहे,” असं शेख मोहम्मद यांनी सांगितल्याचं डब्लूएएम या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. “हॉटेलमधील पाहुण्यांची संख्या एक कोटी २० लाखांहून अधिक असून ही वाढ ४२ टक्के इतकी आहे. हिवाळ्यामध्येही मोठ्या संख्येने पर्यटक येतील असा अंदाज आहे,” असं शेख मोहम्मद म्हणाले आहेत.
या मून रिसॉर्टच्या सह-संस्थापकांपैकी एक असणाऱ्या मायकल आर हेंडरसन यांनी पर्यटकांची संख्या या मून रिसॉर्टमुळे नक्कीच वाढेल असा विश्वास व्यक्त केला आहे. “या मून रिसॉर्टमुळे देशातील सेवा क्षेत्र, मनोरंजन, पर्यटन, शिक्षण, तंत्रज्ञान, पर्यावर आणि अवकाश पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये हातभार लागणार आहे,” असं हेंडरसन म्हणाले आहेत.