Dubai Rental House Viral Video : दुबईचे नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर लगेचच चकचकीत इमारती आणि आलिशान लाइफस्टाईलचे चित्र डोळ्यांसमोर येतं. पण, तुम्हीपण असा विचार करीत असाल की, इथे सगळंच आलिशान, भव्य, सुंदर असं आहे, तर तसं नाही. कारण- तुम्हाला आम्ही दुबईतील असं एक घर दाखवणार आहोत, जे पाहून तुम्हाला दक्षिण मुंबईतील घरांची आठवण येईल. सध्या सोशल मीडियावर दुबईतील मरीना रिअल इस्टेटशी संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात पार्टिशन विथ बाल्कनी म्हणजेच एका घरातील अगदी छोटासा भाग भाड्याने देण्याबाबत जाहिरात केली गेली आहे. त्या छोट्या भागाचं महिन्याचं भाडं इतकं आहे की, ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

आता तुम्ही विचार करीत असाल की, छोटं घर म्हणजे किमान एक खोली किंवा किमान एक स्टुडिओ अपार्टमेंट तरी असेल; पण नाही, तुम्ही विचार करता त्याप्रमाणे काहीच नाही. हे घर इतकं लहान आहे की, त्यात फक्त एकच बेड, एक टेबल व एक लहान कपाट बसू शकेल. हो… म्हणजे घरात पाऊल ठेवताच पुढच्या एका पावलात घर संपतं. याच घरासाठी महिन्याचं भाडं २,७०० दिरहम म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ६२,००० रुपये इतकं असेल.

घर आहे की तिजोरी?

दुबईतील या घराचा व्हिडीओ @neson.services नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला होता, जो आता लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, दुबई मरीनामध्ये रेडी टू मूव्ह पार्टिशन घर भाड्यानं उपलब्ध आहे. विशेष म्हणजे हे घर फक्त महिलांसाठी उपलब्ध आहे. या घराचं भाडं २,७०० दिरहम आणि डिपॉझिट ५०० दिरहम आहे.

हा व्हिडीओ युजर्स त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, हे घरं आहे की तिजोरी? दुसऱ्या युजरने म्हटले की, माझी बाल्कनी यापेक्षा मोठी आहे! त्याचप्रमाणे, तिसऱ्या एका युजरने लिहिले की, मला या पोस्टमुळेच क्लॉस्ट्रोफोबिया झाला. शेवटी एकाने लिहिले की, मुंबईकरांसाठी हे घर म्हणजे स्वर्ग आहे.

दुबईतील ‘पार्टिशन’ घर म्हणजे काय?

दुबईमध्ये ‘पार्टिशन’ घर म्हणजे एका मोठा फ्लॅट किंवा व्हिलातील एका छोटासा भाग, जो लाकूड, काच किंवा पडद्याच्या मदतीनं पार्टिशन करून उपलब्ध केला जातो. हा छोटासा भाग भाड्यानं दिला जातो; पण मधे कोणतीही भिंत, दरवाजा नसल्यानं ‘प्रायव्हसी’ मिळू शकत नाही.