एक रुपयाच्या फ्लॅश सेलला सुरूवात होताच शाओमी इंडियाचं संकेतस्थळ आज क्रॅश झालं. Xiaomi च्या संकेतस्थळावर आज दुपारी 4 वाजेपासून Xiaomi Poco F1 या स्मार्टफोनच्या एक रुपयात फ्लॅशसेलचं आयोजन करण्यात आलं होतं. या सेलमध्ये पोको एफ 1 व्यतिरिक्त शाओमीचा 360 डिग्री सिक्युरिटी कॅमेऱ्याची विक्री होणार होती. पोको एफ 1 चे 10 फोन आणि 35 सिक्युरिटी कॅमेऱ्यांची विक्री होणार होती. मात्र, या दोन्ही उपकरणांसाठी ग्राहकांची अक्षरशः झुंबड उडाली. जवळपास अर्धातास वेबसाइट डाऊन झाली होती आणि त्यानंतर ‘Nope, No Carrots here’असा संदेश दिसत होता.
आजपासून सुरू झालेला हा सेल 25 ऑक्टोबरपर्यंत सुरू असेल. या सेलचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे यामध्ये दररोज एक रुपयाच्या फ्लॅशसेलचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे एक रुपयात फोन खरेदी करण्याची बुधवारी पुन्हा संधी असणार आहे. पण बुधवारी पोको एफ 1 हा फोन उपलब्ध नसेल. त्याऐवजी रेडमी नोट 5 प्रो हा 14 हजार 999 रुपयांचा स्मार्टफोन आणि 799 रुपये किंमतीचे एमआय कॉम्पॅक्ट ब्ल्यूटुथ ऑडिओ स्पिकर-2 अवघ्या एक रुपयात उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. बुधवारी संध्याकाळी 4 वाजेपासून हा सेल सुरू होत आहे. त्यानंतर सेलच्या अखेरच्या दिवशी Mi A2 हा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी असेल. शाओमीने फ्लॅश सेल व्यतिरिक्त Small=Big या नावानेही ऑफर आणली असून यामध्ये दर्जेदार उपकरणं कमी किंमतीत उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. या ऑफरमध्ये तुम्ही रेडमी 6A आणि 10000 mAh पावरबँक या दोन्ही गोष्टी अवघ्या 699 रुपयांत खरेदी करु शकतात. यासह अन्य अनेक उपकरणं या ऑफरमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.