इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केली जाणारी सेलिब्रिटी कायली जेनर हिचा विक्रम चक्क एका अंड्यानं मोडला आहे. कायलीनं फेब्रुवारी २०१८ मध्ये एक पोस्ट शेअर केली होती. तिनं आपल्या पोस्टमधून मुलगी स्ट्रोर्मीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तब्बल १ कोटी ८४ लाखांहून अधिक लाइक्स होते. २०१८ मधला इन्स्टाग्रामवरचा सर्वाधिक लाइक्स असलेला हा फोटो ठरला होता. मात्र एका अंड्याच्या फोटोमुळे तिचा विक्रम मोडीत निघाला आहे. या अंड्याच्या फोटोला चक्क ३ कोटी ९२ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहे.
काही दिवसांपूर्वी ‘वर्ल्ड रेकॉर्ड एग’ नावानं एक इन्स्टाग्राम पेज सुरू करण्यात आलं होतं. यावर एका अंड्याचा फोटो शेअर करण्यात आला होता. ‘या पोस्टद्वारे अंड्याला सर्वाधिक लाइक्स मिळवून द्या’ असं आवाहन करण्यात आलं होतं आणि अल्पावधितच या पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत ३ कोटी ९२ लाखांहून अधिक लोकांनी अंड्याची पोस्ट लाइक केली आहे त्यामुळे साहजिकचा कायलीचा जुना इन्स्टाग्राम रेकॉर्ड मोडला गेला आहे.
आश्चर्य म्हणजे केवळ अंड्याचा एकच फोटो असलेल्या य अकाऊंटचे ५५ लाखांहून अधिक फॉलोअर्सदेखील आहे. हे अकाऊंट कोणी सुरू केलं, यामागची कल्पना कोणाची हे मात्र कळलं नाही, पण कायलीला मागे टाकणाऱ्या या अंड्याची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.