इजिप्तमधील प्राणी संग्रहालयात घडलेला एक हास्यास्पद प्रकार नुकताच समोर आला आहे. चक्क गाढवाच्या अंगावर काळ्या पट्ट्या रेखाटून ते गाढव झेब्रा म्हणून प्राणी संग्रहालयात ठेवण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना अशाच प्रकारे मूर्ख बनवलं जात होतं. मात्र हे प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्यांनं या प्रकाराची पोलखोल केली आहे.
त्यानं हा फोटो सोशल मीडियावर शेअर करून संग्रहालयाची लबाडी उघडकीस आणली आहे. त्यानंतर अल्पावधीतच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. प्राणी संग्रहालयात झेब्रा नसल्यानं गाढवाच्या अंगावर रंगाच्या साह्यायानं पट्टे ओढण्यात आले. कैरो इंटरनॅशनल म्युझिअम पार्कमध्ये हा प्रकार घडला. काही वर्षांपूर्वी गाझामधील एका प्राणी संग्रहालयात देखील असाच प्रकार घडला होता. तिथे देखील दोन गाढवांच्या अंगावर पट्टे रेखाटण्यात आले होते.