कुंभमेळा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सोहळा आहे. शेकडो वर्षांपासून कुंभ मेळ्याची परंपरा सुरू आहे. कुंभ मेळ्यासाठी देशातूनच नव्हे, तर जगभरातील भाविक हजेरी लावतात. यंदाचा कुंभ मेळा अनेक अर्थांनी खास आहे. कारण- यंदाचा कुंभ हा महाकुंभ आहे. त्यामुळेच लोक मोठ्या प्रमाणात या कुंभ मेळ्याला येत आहेत.

प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यामध्ये देशातील अनेक साधू-संत आणि भाविक दाखल होतायत. एकीकडे महाकुंभ मेळा सुरू असताना दुसरीकडे त्यातील साधू, साध्वी, तसेच आयआयटीयन्स बाबांची चर्चा रंगली आहे. तसेच या कुंभ मेळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या महाकुंभ मेळ्यातील एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक आजी-आजोबा अगदी बेभान होत पारंपरिक नृत्य करताना दिसतायत.

आजी-आजोबांचं पारंपारिक नृत्य

महाकुंभ मेळ्यातील एका हृदयस्पर्शी व्हिडीओने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या व्हिडीओमध्ये त्रिवेणी संगमावर एका वृद्ध जोडपे आनंदाने आणि भक्तीने नाचताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या रीलने लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणले आणि या जोडप्याला बघून त्यांना ‘विठ्ठल-रखुमाई’ची आठवण करून दिली.

प्रयागराजमध्ये नृत्य करणारी ही जोडी भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी (ज्यांना प्रेमाने रखुमाई म्हणतात) यांच्यासारखे वाटतात, असे नेटिझन्सचे म्हणणे आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, या आजीने नऊवारी साडी आणि आजोबांनी धोतर, सदरा व टोपी असा वारकऱ्यांसारखा पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केला आहे. तसेच व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, जोडप्याने ‘फुगडी’ खेळत आनंद लुटला आहे. एकमेकांना साथ देत दोघेही अगदी तालात नृत्य करताना दिसतायत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @haq_se_single या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘महाकुंभ मेळ्यात एका वयोवृद्ध जोडप्याच्या डान्सनं जिंकलं सगळ्यांचं मन’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच या व्हिडीओला तब्बल २.७ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “जर खऱ्या प्रेमाला चेहरा असता, तर तो या आजी- आजोबांसारखाच दिसला असता.” दुसऱ्याने कमेंट करीत लिहिले, “तिने ज्या प्रकारे तिच्या नवऱ्याच्या पाया पडून नमस्कार केला. तीच तर आहे महाराष्ट्राची संस्कृती.” एकाने, “तो तिचा विठ्ठल ती त्याची रखुमाई” अशी कमेंट केली.

Story img Loader