Viral Video: श्वान मानवाचा सर्वांत विश्वासू मित्र म्हणून ओळखला जातो. श्वानाच्या निष्ठेवर देशात आणि जगात अनेक चित्रपट बनविले गेले आहेत. श्वान कधी कधी त्यांच्या मालकांसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतात. म्हणूनच प्राणी आणि त्यांचे पालक यांच्यातील बंध खरोखरच खास असतात. याचेच एक उदाहरण पुन्हा आज व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळालं आहे. एक वृद्ध पाळीव पालक व त्याच्या श्वानाचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल झाला आहे; ज्याने अनेकांची मने जिंकली आहेत.

व्हायरल व्हिडीओ परदेशातला आहे. आजोबा आणि त्यांचा लाडका श्वान चारचाकी वाहनाजवळ उभे आहेत. आजोबांना श्वानाला गाडीच्या डिकीत बसवायचे असते. आपला मालक आपल्याला गाडीत चढविण्यासाठी काहीतरी मार्ग काढेल याची श्वान वाट पाहत असतो. तितक्यात आजोबा वाहनाच्या डिकीतून फोल्ड करण्यायोग्य प्लास्टिक स्लायडर बाहेर काढतात आणि तो जमिनीवर टेकवून ठेवतात; जेणेकरून स्लायडरच्या मदतीने श्वान गाडीत अगदी आरामात चढू शकेल. आजोबा आणि श्वानाचा हा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…‘नियम म्हणजे नियम…!’ सिग्नल पाहून थांबली ‘गाय’, वाहतूक नियमाचे पालन; VIDEO शेअर करीत पुणे पोलिसांकडून कौतुक

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, पार्किंगच्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती गाडीत बसून हे सर्व दृश्य पाहत असते. आजोबा श्वानाला गाडीत बसविण्यासाठी मेहनत घेत आहेत. आपल्या विश्वासू साथीदाराला गाडीत चढविण्यासाठी डिकीतून फोल्ड करण्यायोग्य प्लास्टिक स्लायडर बाहेर काढतात आणि शिडीप्रमाणे त्याला गाडीत चढण्यासाठी एक मार्ग शोधून काढतात. श्वानदेखील आपल्या मालकास सुचवतो आणि स्लायडरच्या साह्याने गाडीत चढतो. श्वान गाडीत चढताच आजोबा स्लायडर काढून पुन्हा कारच्या आत ठेवतात. हे दृश्य अज्ञात व्यक्तीच्या मनाला भावले.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओला ‘दोन चांगले मित्र’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी असा एक मित्र आयुष्यात असावा, असं आवर्जून म्हणत आहेत. तसेच आपल्याला मालकाला श्वान कशा पद्धतीत प्रोत्साहन देतो याचेसुद्धा अनेक युजर्स कमेंटमध्ये कौतुक करताना दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांची मने जिंकली आहेत, असे म्हणायला हरकत नाही