Elephant Viral Video : वाढत्या शहरीकरणामुळे जंगलतोडीचे प्रमाण वाढतेय. या जंगलतोडीमुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात आलाय, अनेक प्राण्यांना जंगलात आता पुरेशा प्रमाणात अन्न मिळत नसल्याने ते अनेकदा मानवी वस्तीत शिरताना दिसतात. पण, आतापर्यंत तुम्ही साप, माकड अशा प्राण्यांनी मानवी वस्तीत हैदोस घातल्याचे पाहिले असेल. पण, व्हायरल व्हिडीओत चक्क भुकेलेल्या हत्तीने एका घरात हैदोस घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भयानक गोष्ट म्हणजे या हत्तीने घरात शिरता न आल्याने आपल्या सोंडेने स्वयंपाकघर उद्ध्वस्त केले आहे. यावेळी घरातील एका व्यक्तीने ही घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आहे.
तमिळनाडूतील कोईम्बतूर येथील थेरकुपलाय भागात शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. हत्तीने सर्वप्रथम घरात घुसण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचे प्रयत्न अपयशी ठरले. पण, अचानक आलेल्या हत्तीला पाहून तेथील उपस्थित लोकही खूप घाबरले. सुदैवाने यावेळी कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
त्याचे घडले असे की, जंगल परिसरातील एका घरात चार मजूर जेवण बनवत होते. यावेळी दरवाजासमोर त्यांना हत्तीच्या हालचाली दिसून आल्या. यावेळी हत्ती घरात शिरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसल्यावर मजुरांनी लगेच गॅस शेगडी बंद केली आणि परिस्थिती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला.
हत्तीने सोंडेने उचलली तांदळाची पोती अन्…
हत्तीने त्याच्या सोंडेने गॅस सिलिंडर पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मजुरांनी आधीच गॅस बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली. पण, हत्तीने आपल्या सोंडेने स्वयंपाकघरातील सर्व वस्तू पाडून टाकल्या. त्यानंतर घराभोवती फिरून वस्तूंचा शोध घेतल्यानंतर हत्तीने सोंडेने घरात ठेवलेली तांदळाची पोती उचलली आणि तिथून तो शांतपणे निघून गेला.
यावेळी कामगारांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ही संपूर्ण घटना रेकॉर्ड केली. व्हिडीओमध्ये हत्ती घरात डोकावताना आणि वस्तूंचा वास घेताना दिसत आहे. मात्र, त्याच्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.