सामाजिक जीवनात सातत्याने घटत्या जन्मदराचा मुद्दा मांडणारे उद्योगपती एलॉन मस्क हे बाराव्यांदा बाबा झाले आहेत. एलॉन मस्क आणि शिवोन झिलीस या दाम्पत्याला काही महिन्यांपूर्वीच मूल झाल्याचं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे. शिवोनी झिलीस या एलॉन मस्क यांच्याच मालकीच्या न्यूरालिंक या ब्रेन ट्रान्स्प्लांट कंपनीच्या कार्याधिकारी आहेत. शिवोनी आणि एलॉन मस्क यांचं हे तिसरं मूल असून त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून हे सगळ्यांपासून लपवून ठेवल्याचंही बोललं जात आहे. मात्र, खुद्द एलॉन मस्क यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे.

एलॉन मस्क व शिवोन झिलीस यांना या वर्षाच्या सुरुवातीलाच मूल झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मात्र, या दोघांनी याबाबत जाहीरपणे भाष्य केलं नसल्यामुळे त्यांना ही बाब इतरांपासून लपवून ठेवायची होती, असं सांगितलं जात आहे. यासंदर्भात खुद्द एलॉन मस्क यांनीच स्पष्टीकरण दिल्याचं वृत्त एनडीटीव्हीनं पेज सिक्स या संकेतस्थळाच्या हवाल्याने दिलं आहे.

काय म्हणाले एलॉन मस्क?

एलॉन मस्क यांनी मूल झाल्याचं लपवल्याचा दावा फेटाळून लावला आहे. “आमच्या सर्व मित्रमंडळी व जवळच्या नातेवाईकांना यासंदर्भात माहिती होतं. याबाबतचं प्रसिद्धीपत्रक काढलं नाही याचा अर्थ हे काही सिक्रेट होतं असा होत नाही”, असं एलॉन मस्क म्हणाले आहेत. एलॉन मस्क यांचं हे बारावं मूल असून शिवोन झिलीस यांच्यापासून झालेलं तिसरं मूल आहे. २०२१ मध्ये या दाम्पत्याला स्ट्रायडर आणि अझ्यूर ही दोन जुळी मुलं झाली.

ईव्हीएम मशीनवरून अमेरिकेतही वादावादी; एलॉन मस्क यांनीही केली टीका

याआधी ग्राईम्स नावाच्या महिलेपासून मस्क यांना तीन मुलं झाली आहेत. शिवोन झिलीस यांच्यापासून झालेल्या तिसऱ्या मुलाच्या काही दिवस आधीच ग्राईम यांनाही तिसरं मूल झालं आहे. यांदर्भात बोलताना ग्राईम्स यांनी शिवोन झिलीस यांच्याशी कोणतेही मतभेद नसून त्यांच्यासोबत आम्ही एकत्र मिळून मुलांचं संगोपन करण्यासाठी उत्सुक आहोत, असं ग्राईम्स यांनी सांगितल्याचं एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटलं आहे.

मोठ्या कुटुंबांना मस्क यांचा पाठिंबा!

एकीकडे भारतात ‘हम दो हमारे दो’ या धोरणाचा पुरस्कार केला जात असताना दुसरीकडे एलॉन मस्क मात्र अनेक मुलं आणि मोठ्या कुटुंबांचा पुरस्कार करताना दिसत आहेत. जुलै २०२२ मध्ये त्यांनी मोठ्या कुटुंबांचं समर्थन करण्यास सुरुवात केली. तसेच, आपल्यालाही अधिकाधिक मुलं व्हावीत अशी इच्छा आहे, असंही ते म्हणाले होते. “आत्तापर्यंत मानवी समाजाने सामना केलेल्या संकटांपैकी सर्वात भयंकर संकट म्हणजे वेगाने घटणारा जन्मदर आहे”, असं आपल्या एका सोशल पोस्टमध्ये एलॉन स्क म्हमाले होते.