टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी एप्रिल महिन्यामध्ये ट्विटर खरेदी करण्याचा मानस जुलै महिन्यामध्ये खोडून काढत या संभाव्य करारातून माघार घेतली. आता या प्रकरणाची अमेरिकेतील न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर एवढी प्रचंड रक्कम खर्चून ट्विटर खरेदी करत असल्याचे जाहीर केले होते. ट्विटरच्या संचालक मंडळानेसुद्धा या व्यवहाराला मंजुरी दिली होती. मात्र आता या व्यवहारासंदर्भात एक वेगळीच माहिती समोर आली आहे. हा व्यवहार तातडीने होऊ नये असं मस्क यांना वाटतं होतं. एका खासगी संवादामध्ये मस्क यांनी या व्यवहारामध्ये अधिक धोका असल्याचं मत व्यक्त करताना रशिया आणि युक्रेन युद्धाचासंदर्भ देत, ‘जग तिसऱ्या महायुद्धाकडे जात असेल तर ट्वीटर खरेदी करण्यात अर्थ नाही’ असं म्हटलं होतं.
सध्या मस्क आणि ट्वीटर यांच्यादरम्यान अमेरिकेतील न्यायालयामध्ये सुरु असणाऱ्या सुनावणीदरम्यान मस्क यांनी पाठवलेल्या या खासगी टेक्स मेसेजचा संदर्भ समोर आल्याचं वृत्त बिझनेस इनसायडरने दिलं आहे. ही सुनावणी आता ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली असली तर मस्क यांना हा करार करताना तिसऱ्या महायुद्धाची भिती वाटत होती हा विषय सध्या चर्चेत आहे. जुलैमध्ये या व्यवहारामधून माघार घेताना ट्विटरने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप मस्क यांनी केला. ट्विटरकडून बनावट खात्यांची माहिती देण्यात येत नसल्याचे कारण देत मस्क यांनी ट्विटर खरेदीच्या व्यवहारातून माघार घेतली होती.
दरम्यान हा व्यवहार रद्द करण्यासंदर्भात न्यायालयामध्ये सुरु असणाऱ्या सुनावणीमध्ये मस्क यांनी ८ मे रोजी मॉर्गन स्टॅनली या नामांकित कंपनीच्या बँकरला पाठवलेल्या मेसेजचा खुलासा झाला आहे. मस्क आणि ट्विटरदरम्यानच्या करारामध्ये मॉर्गन स्टॅनली कंपनी आर्थिक व्यवहार पाहत आहे. या मेसेजमध्ये मस्क यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भाषणाचा संदर्भ दिला होता. ९ मे रोजी नाझीच्या जर्मनीवर विजय मिळवल्याच्या पार्श्वभूमीवर साजरा करण्यात आलेल्या ७७ व्या विजय दिनानिमित्त पुतीन यांनी भाषण दिलं होतं. रशियातील नागरिकांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय योग्य असल्याचा दावा पुतीन यांनी केला होता. याच भाषणात पुतिन यांनी पाश्चिमात्य देश रशियावर आक्रमण करणार होते असा दावाही पुतीन यांनी कोणत्याही पुरावे न देता केला होता.
याच पार्श्वभूमीवर मस्क यांनी त्यांच्या आणि ट्वीटरदरम्यानच्या आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला पाठवलेल्या मेसेजमध्ये, “काही दिवस या व्यवहारासंदर्भात जरा संथ गतीने काम करुयात,” असं म्हटल्याचा दावा ट्वीटरच्या वकिलांनी न्यायालयात केला. “पुतीन यांचं उद्याचं भाषण फार महत्त्वाचं आहे. आपण तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत असू तर ट्वीटर विकत घेण्यात काही अर्थ नाही,” असं मस्क यांनी पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटल्याचं ट्वीटरच्या वकीलांनी मेसेज न्यायालयात वाचून दाखवत सांगितलं.
यावर मस्क यांचे वकील अॅलेक्स स्पीरो यांनी, “हा पूर्णपणे तर्कशून्य दावा आहे. संपूर्ण संवाद पाहिल्यास हे लक्षात येईल,” असं म्हटलं.