गुगलचे सह-संस्थापक सर्जी ब्रिन यांची पत्नी निकोल शानाहानसोबत टेस्लाचे सह-संस्थापक इलॉन मस्क यांचं प्रेमप्रकरण सुरु असल्याचं वृत्तसमोर आलं आहे. मात्र आता या प्रकरणामध्ये मस्क यांनी आपली बाजू मांडताना ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलेलं वृत्त फेटाळून लावलं आहे. मस्क आणि पत्नी निकोलचे प्रेमसंबंध असल्याने ब्रिन यांनी त्यांच्या सल्लागारांना इलॉन मस्क यांच्या कंपन्यांमध्ये असणारी खासगी गुंतवणूक मागील काही महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात काढून घेण्याचे निर्देश दिल्याचं वृत्त समोर आल्यानंतर मस्क यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रकरण काय?
मस्क हे टेस्ला कंपनीचे सह-संस्थापक आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला मयामीमध्ये मस्क आणि निकोल शानाहान हे पहिल्यांदा संपर्कात आल्याचं सांगितलं जातं असं ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. या प्रकरणाशी संबंधित लोकांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आलंय. याच कथित प्रेमप्रकरणामुळे मस्क आणि ब्रिन यांची मैत्री संपुष्टात आली. ५१ वर्षीय मस्क यांची इलेक्ट्रीक कार कंपनी आर्थिक संकटात सापडली होती त्यावेळी म्हणजेच २००८ साली ब्रेन यांनी मोठी मदत केली होती. ४८ वर्षीय ब्रिन यांनी पत्नी निकोलपासून याच वर्षी जानेवारी महिन्यात घटस्फोट घेतला आहे.
घटस्फोटावरुन वाद
मयामीमधील आर्ट बासीलमध्ये मस्क आणि ब्रिन यांची पत्नी निकोल यांच्यामध्ये प्रेमसंबंध जुळून आल्याचं ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने या प्रकरणाशी संबंधित जवळच्या व्यक्तींच्या हवाल्याने सांगितलं आहे. यासंदर्भात ब्रिन यांची मस्क यांनी एका कार्यक्रमात माफीही मागितली होती. ब्रिन आणि निकोल यांच्यामध्ये सध्या घटस्फोटाच्या पोटगीवरुन वाद सुरु असून निकोल यांनी पोटगी म्हणून १ बिलीयन अमेरिकी डॉलर्सची मागणी केली आहे.
मस्क काय म्हणाले?
याच बातमीच्या एका लिंकवर मस्क यांनी ट्विटरवरुन रिप्लाय करत हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलंय. “हे पूर्णपणे खोटं आहे. सर्जी आणि मी मित्र आहोत. काल रात्रीच आम्ही एकत्र एका पार्टीला होतो,” असं मस्क म्हणाले आहेत. पुढे मस्क यांनी, सर्जी यांच्या पत्नीला आपण तीन वर्षात दोनदा भेटलो असल्याचा खुलासा केलाय. “मी निकोलसला मागील तीन वर्षांमध्ये केवळ दोनदाच पाहिलं आहे. दोन्ही वेळेस आमची भेट सार्वजनिक ठिकाणी झाली होती. यात रोमॅण्टीक असं काही नव्हतं,” असं मस्क यांनी म्हटलंय.
मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स म्हणजेच श्रीमंताच्या यादीमध्ये मस्क हे २४२ बिलीयन अमेरिकी डॉलर्सच्या संपत्तीसहीत पहिल्या स्थानी आहेत. तर याच यादीत ब्रिल हे आठव्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही ९४.६ बिलीयन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे.
वादग्रस्त खासगी आयुष्य
मस्क यांच्या खासगी आयुष्यासंदर्भात नुकत्याच समोर आलेल्या काही गोष्टींमध्ये या प्रेमप्रकरणाबद्दलही खुलासा झाला. न्यूरालिंक या आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीमधील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यापासून मस्क यांना जुळी मुलं झाल्याची माहिती या वर्षाच्या सुरुवातीला समोर आली होती. इनसायडरने दिलेल्या वृत्तानुसार स्पेसएक्स कंपनीमधील एका महिला कर्मचाऱ्याने मस्क यांच्याविरोधात केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये अडीच लाख अमेरिकन डॉलर्सची सेटलमेंट करण्यात आली. ट्विटर कंपनीसोबतच्या करारामध्ये अडथळे आणण्याच्या उद्देशाने हे आरोप केल्याचा दावा मस्क यांनी केला. मस्क यांनी हे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचं म्हटलं होतं. आता मस्क यांनी ट्विटरसोबतच्या करारामधून माघार घेतलीय.