जगातील प्रसिद्ध मासिक टाइमने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर २०२१’ म्हणून निवड केली आहे. एलन मस्क हे टेस्ला आणि स्पेसएक्स या कार कंपनीचे सीईओ आहेत. मॅगझिननुसार, एलन मस्क यांची निवड त्यांच्या अंतराळातील कामासाठी तसेच इलेक्ट्रिक कारसाठी करण्यात आली आहे. “पर्सन ऑफ द इयर एखाद्या व्यक्तीचा प्रभाव प्रतिबिंबित करतो आणि पृथ्वीवरील किंवा पृथ्वीच्या बाहेरील जीवनावर छाप पाडणारे कमी लोक आहेत. एलन मस्क हे २०२१ मध्ये आपल्या समाजातील बदलाचे सर्वात मोठे उदाहरण आहेत.”, असे गौरवोद्गार टाइम मासिकाचे मुख्य संपादक एडवर्ड फेलसेन्थनल यांनी काढले.

टेस्लाचे बाजारमूल्य यावर्षी एक ट्रिलियन डॉलर्स (सुमारे ७६ लाख कोटी रुपये) पर्यंत वाढले आहे. कंपनीचे मूल्य आता फोर्ड मोटर आणि जनरल मोटर्सच्या एकत्रित मूल्यापेक्षा जास्त झाले आहे. टेस्ला दरवर्षी लाखो मोटारींचे उत्पादन करते आणि पुरवठा साखळीतही प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा चांगलं यश संपादन केलं आहे.

टाईम मासिकाच्या मते, “द पर्सन ऑफ द इअर” ही अशी व्यक्ती असते की, त्या व्यक्तीचा बातम्यांवर किंवा लोकांच्या जीवनावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो. टाईम मासिकाने पॉप गायिका ऑलिव्हिया रॉड्रिगोला “एंटरटेनर ऑफ द इयर”, अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बिलेस “अॅथलीट ऑफ द इयर” आणि लस शास्त्रज्ञांना “हीरोज ऑफ द इयर”ने सन्मान केला आहे. गेल्या वर्षी अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष जो बिडेन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना संयुक्तपणे ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून गौरविण्यात आले. टाइम मासिकाने ही परंपरा १९२७ मध्ये सुरू केली. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनाही यापूर्वी हा मान मिळाला आहे.

Story img Loader