टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून या सोशल मीडिया साइटवर वादविवादाचे सत्र थांबायचे नाव घेत नाही आहे. ट्विटरवर मालकी मिळाल्यानंतर मस्क यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यातीलच एक निर्णय म्हणजे यापुढे प्रत्येक व्यक्तीला ब्लु टिक मिळवण्याचा अधिकार असेल. मात्र, ज्या कोणालाही व्हेरीफाईड अकाउंट हवे असेल, त्याला यासाठी आठ डॉलर म्हणजे जवळपास ६५० रुपये भरावे लागणार आहेत. ही किंमत भारतातील असून प्रत्येक देशानुसार ही रक्कम बदलत जाईल.
मस्क यांच्या या निर्णयाला अनेकजणांनी विरोध केला. मात्र मस्क यांच्यावर याचा काहीही परिणाम झाल्याचं दिसत नाही. याउलट ते त्यांना विरोध करणाऱ्या लोकांचीच टिंगल करताना दिसत आहेत. दरम्यान, इलॉन मस्क यांच्या नावाने हिंदीत केलेल्या ट्विटमुळे भारतीय आश्चर्यचकित झाले आहेत. “’ट्विटर तेरे टुकड़े होंगे’ गैंग को भी $8 देने पड़ेंगे”; “इस बार चलेगी झाड़ू, इस बार चलेगी झाड़ू!”; “भ्रष्टाचारी ट्विटर पर वार करेगी झाड़ू!”; “ये बिक गई है चिड़िया”; “कमरिया करे लपालप, की लॉलीपॉप लागेलू”, अशा पद्धतीचे काही ट्विट इलॉन मस्क यांच्या नावाने केले गेले आहेत, जे आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व ट्विट्स हिंदी भाषेमध्ये करण्यात आले आहेत. या ट्विट्सपैकी एका ट्विटमध्ये प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता-गायक पवन सिंग याचे गाणे आहे. हे ट्विट पाहिल्यानंतर पवन स्वतः थक्क झाला. यानंतर त्याने इलॉन मस्क यांचे आभारही मानले. मात्र, आता सर्वांनाच असा प्रश्न पडला आहे की जगातील सर्वांत श्रीमंत अमेरिकन व्यक्तीला हिंदीमध्ये ट्विट करण्याची कल्पना कशी सुचली किंवा त्याने असे का केले असेल? तर या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे.
ज्या अकाउंटवरून हे सर्व ट्विट्स करण्यात आले आहेत ते इलॉन मस्क यांचे नाही. ज्या व्यक्तीचे हे अकाउंट आहे त्याने मस्क यांना चिडवण्यासाठी त्यांचे नाव या अकाउंटला जोडले आहे. त्याने मस्क यांचा प्रोफाइल फोटोही वापरला आहे. मात्र प्रत्यक्षात ही वेगळीच व्यक्ती असून तिचे नाव इयान वूलफोर्ड आहे.
इयान वूलफोर्ड ऑस्ट्रेलियातील ला ट्रोब विद्यापीठात हिंदीचे प्राध्यापक आहेत. इतकेच नाही तर त्यांनी ऑस्ट्रेलिया इंडिया इन्स्टिट्यूट आणि एशिया लिटरसी अॅम्बेसेडरमध्ये फेलोशिपही केली आहे. त्यांना हिंदी भाषेची इतकी आवड आहे की त्यांनी यामध्ये पीएचडीही केली आहे. दरम्यान, वूलफोर्ड यांना केवळ हिंदीच नाही, तर मैथिली, अंगिका, भोजपुरी आणि नेपाळी अशा अनेक उत्तर भारतीय भाषांचे भरपूर ज्ञान आहे.
शनिवारी ५ नोव्हेंबरच्या सकाळी, इलॉन मस्क यांच्या क्लोन केलेल्या अकाउंटने सर्वांना आश्चर्यचकित केले. यानंतर अनेकांना मस्क यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे वाटले. मात्र, तसे झाले नाही. ट्विटर युजर वूलफोर्ड यांनी त्यांच्या खात्याचे नाव बदलून इलॉन मस्क केले होते. वूलफोर्ड यांनी मस्क यांच्या नावाने हिंदी आणि भोजपुरी अशा दोन्ही भाषेत अनेक ट्विट केले होते. मात्र, ट्विटरने इलॉन मस्कच्या नावाने ट्विट करणारे खाते आता निलंबित केले आहे.