टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे नेहमी चर्चेत राहणारं नाव. सोमवारी मस्क यांनी ट्विटरमधील समभाग विकत घेतल्याची घोषणा केली. ‘ट्विटर’वर मुक्त अभिव्यक्तीबद्दल आक्षेप असूनही, मी ट्विटरमध्ये ९.२ टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. आता मस्क यांच्याकडे ट्विटरची सर्वात जास्त हिस्सेदारी आहे. तर, ट्विटरचे सर्वात मोठे समभागधारक झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच एलन मस्क यांनी ट्विटरवर एक पोल घेतलाय. त्यांच्या या ट्वीटनंतर या पोलचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे.
ट्विटरचे सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालय बेघर लोकांसाठी आश्रयस्थानात रूपांतरित केले जावे का?, याबद्दल मस्क यांनी पोल घेतला आहे. मस्क यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, “ट्विटरचे सॅन फ्रान्सिस्को येथील मुख्यालय बेघर लोकांसाठी आश्रयस्थानात रूपांतरित केले जावे का? कारण असंही तिथे कोणी दिसत नाही.” दरम्यान, मस्क यांच्या या पोलला आतापर्यंत ७ लाख ५२ हजार मतं मिळाली असून सर्वाधिक लोकांनी ‘होय’ असं उत्तर दिलंय.
ट्विटरची किती मालकी कोणाकडे?
एलन मस्क यांनी ९.२ टक्के भागभांडवल खरेदी करण्यासाठी ३ बिलियन अमेरिकन डॉलर्स खर्च केलं. ते कंपनीचे सर्वात मोठे भागभांडवलधारक झाले आहे. या कंपनीची ८.८ टक्के भागभांडवल हे व्हॅनगार्ड ग्रुपकडे, ८.४ टक्के मॉर्गन स्टॅनली कंपनीकडे तर २.२ टक्के भागभांडवल कंपनीचे सहसंस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्से यांच्याकडे आहेत.