जगातील सर्वाधिक चर्चेत असणारी आणि चर्चा घडवून आणणारी वेबसाईट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विटरने सोमवारी मोठ्या खांदेपालटासंदर्भातील घोषणा केली. कंपनीचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी यांनी मुख्य कार्यकारी पदाचा म्हणजेच सीईओ पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजेच डॉर्सी यांचे उत्तराधिकारी म्हणून सध्या ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांना नियुक्त करण्यात येणार आहे. यासंदर्भातील घोषणा कंपनीने केल्यानंतर भारतीय वंशाची व्यक्ती ट्विटरच्या सर्वोच्चपदी विराजमान होत असल्याबद्दल भारतीयांनी आनंद व्यक्त केला. मात्र या घडामोडीवर वक्तव्य करताना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे तसेच ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे सर्वोसर्वा एलॉन मस्क यांनीही प्रतिक्रिया नोंदवलीय.

नक्की वाचा >> आनंद महिंद्रा म्हणतात, “जगभरात पसरलेल्या या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान, यावर कोणतीही…”

गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅडॉब, आयबीएम, पालो अॅल्टो नेटवर्क आणि आता ट्विटरचे सीईओ सुद्धा भारतीय आहेत. तंत्रज्ञानाच्या जगात भारतीयांचे हे यश कमालीचं आहे. यामधून अमेरिका विस्थापितांना किती संधी देते हे दिसून येतं, असं एक ट्विट पॅट्रीक कोलीसन यांनी पराग यांची ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती होण्याच्या घोषणेनंतर केलं. हे ट्विट सध्या व्हायरल झालं असून ११ हजारांहून अधिक जणांनी ते रिट्विट केलंय.

एलॉन मस्क म्हणतात…
या ट्विटवर एक हजारांहून अधिक जणांनी रिप्लाय केलाय. विशेष म्हणजे ट्विटवर प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये काळाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांपैकी एक असणाऱ्या एलॉन मस्क यांचाही समावेश आहे. “भारतीयांच्या कौशल्याचा अमेरिकेला फार फायदा होतोय,” असं मस्क यांनी या ट्विटवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय.

कोण आहेत पराग अग्रवाल?
ट्विटरची धुरा संभाळण्यासाठी सज्ज असलेले पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. ते २०११ पासून कंपनीच्या सेवेत आहेत. २०१७ मध्ये त्यांची कंपनीचे ‘सीटीओ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. जॅक डॉर्सी सीईओपदाचा राजीनामा देणार असले तरी कंपनीच्या संचालक मंडळावर मुदत संपेपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत राहणार आहेत. अग्रवाल यांनी जॅक आणि संपूर्ण टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे ट्वीट केले. जग आपल्याकडे पूर्वीपेक्षाही अधिक अपेक्षेने पाहत आहे. आपण ती अपेक्षापूर्ती करूया, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे.

भारतीयांचा दबदबा…
जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या ‘सीईओ’पदी अनेक भारतीय विराजमान आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अ‍ॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.

Story img Loader