एलॉन मस्क हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात, कधी त्यांच्या सोशल पोस्टमुळे तर कधी त्यांच्या निर्णयांमुळे ते चर्चेत असतात. मध्यंतरी फेसबुकच्या मार्क झकरबर्ग यांच्याशी फाईटचं चॅलेंज चांगलंच चर्चेत आलं होतं. यानंतर आता पुन्हा एकदा एलॉन मस्क सोशल मीडिया साईट ट्विटरवर चर्चेत आले आहेत. त्यांची एक पोस्ट सध्या व्हायरल होत असून त्यावर नेटिझन्सच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रियाही येत आहेत.
बुधवारी सकाळी एलॉन मस्क यांनी एका एक्स पोस्टवर दिलेल्या या प्रतिक्रियेवर आत्तापर्यंत हजारो युजर्सनी पोस्ट केल्या असून तब्बल ७६ हजाप एक्स युजर्सनी एलॉन मस्क यांची पोस्ट लाईक केली आहे. तसेच ७ हजार ६०० युजर्सनं ती रीशेअर केली आहे. ही पोस्ट माईक पेसा नावाच्या एका युजरनं केलेल्या पोस्टवर असून माईक पेसानं द न्यूयॉर्क टाईम्समध्ये छापून आलेल्या एका वृत्ताचा फोटो आपल्या पोस्टमझ्ये शेअर केला आहे.
काय आहे या वृत्तामध्ये?
माईक पेसा नावाच्या व्यक्तीने ९ जुलै रोजी द न्यूयॉर्क टाईम्सच्या पहिल्या पानाचा फोटो शेअर केला आहे. एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स मोहिमेसंदर्भातलं हे वृत्त आहे. स्पेस एक्सच्या लाँचिंगवेळी पक्ष्यांची एकूण ९ घरटी उद्ध्वस्त झाल्याचं या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे. पहिल्या पानावर सर्वात महत्त्वाचं स्थान न्यूयॉर्क टाईम्सनं या वृत्ताला दिल्यामुळे संबंधित युजरनं खोचक शब्दांत ही पोस्ट लिहिली होती.
एलॉन मस्क यांची खोचक पोस्ट!
दरम्यान, एलॉन मस्क यांनी माईक पेसा यांच्या या पोस्टचा स्क्रीनशॉट काढून आपल्या पोस्टमध्ये शेअर केला आहे. “या क्रूर गुन्ह्याची शिक्षा म्हणून मी पुढचा आठवडाभर अंड्याचं ऑमलेट खाणार नाही”, असं एलॉन मस्क यांनी आपल्या पोस्टमझ्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटिझन्सच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
मस्क यांच्या पोस्टवर एका युजरनं “न्यूयॉर्क टाईम्सनं बोईंगच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या विमान अपघातांमध्ये शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं वृत्तही त्यांनी दडपून टाकलं”, अशी पोस्ट केली आहे. त्या पोस्टवर पुन्हा एलॉन मस्क यांनी कमेंट करताना न्यूयॉर्क टाईम्सवर टीका केली आहे. “बरोबर. याच वर्तमानपत्रानं बोईंगच्या निष्काळजीपणामुळे शेकडो व्यक्तींना प्राण गमवावे लागल्याचं वृत्त दडपलं होतं”, अशी पोस्ट एलॉन मस्क यांनी केली आहे.