अमेरिकन बँकिंग व्यवस्था सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यात अमेरिकेसह जगभरातील स्टार्टअप्सना आर्थिक मदत करणारी सिलिकॉन व्हॅली बँक मोठ्या अडचणीत सापडली आहे. कमकुवत आर्थिक स्थितीमुळे अमेरिकन नियामकाने ही सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या बँकेची मालमत्ताही जप्त करण्यात आल्याची माहिती फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनेने (FDIC) निवेदनातून दिली आहे. अशा परिस्थितीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेल्सा, ट्विटर या कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांनी अडचणीत सापडलेली ही बँक खरेदी करण्यात रस दाखवला आहे.
रेझरचे सीईओ मिन – लियांग टॅन यांनी ट्वविटरवर सिलिकॉन बँकसंदर्भात एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, ‘माझ्या मते, ट्विटरने सिलिकॉन बँक विकत घेतली पाहिजे आणि तिला डिजिटल बँक बनवली पाहिजे.’
मिन- लियांग टॅनच्या ट्विटला उत्तर देत एलॉन मस्क म्हणाले की, मी या कल्पनेचे स्वागत करतो.
एलॉन मस्क यांच्या या ट्विटवरूनच ते सिलिकॉन व्हॅली बँक खरेदी करण्याचा विचारात असल्याचे अंदाज बांधले जात आहेत.
सिलिकॉन व्हॅली बँक ही अमेरिकेतील १६ वी सर्वात मोठी बँक आहे. या बँकेची मालमत्ता सुमारे २१० अब्ज डॉलर्स इतकी आहे. नव्या तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या आणि उद्यम भांडवल गुंतवणूक कंपन्यांना या बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केले जाते. ही बँक विशेषत: टेक स्टॉर्टअप्सना कर्ज देते. या बँकेचे मुख्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे.
मात्र बंदीच्या घोषणेनंतर बँकेच्या शेअर्समध्ये एका दिवसात ७० टक्क्यांची घसरण झाली आहे. या एका झटक्यामुळे बँकेचे मार्केट कॅप जवळपास ८० अब्ज डॉलर्सने कमी झाले आहे. अमेरिकेतील या घटनेचा परिणाम जगभरातील बाजारावर दिसून येत आहे. यामुळे आज भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण दिसून आली.