Elon Musk Viral Video : तुमच्यापैकी असे अनेक जण असतील जे पार्किंगमध्ये कार कुठे उभी केली हे विसरतात. पीलर नंबर लगेच आठवत नाही. अशावेळी पूर्ण पार्किंगभर कार शोधत बसावे लागते. विशेषत: मॉल, विमानतळ आणि इतर सार्वजनिक कार पार्किंगच्या ठिकाणी अशी परिस्थिती ओढावते. त्यामुळे काम राहिले बाजूला, पण कार शोधण्यातच बराच वेळ जातो. अशाने खूप चिडचिड होते. पण, आता काळजी करू नका? कारण कारमध्ये भविष्यात एक असं फीचर पाहायला मिळणार आहे, ज्याने पार्किंगमधील तुमची कार काही क्षणात तुमच्या समोर येऊन उभी राहील. विश्वास बसत नसेल तर टेस्ला कंपनीचे मालक यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ एकदा पाहा. यात पार्किंगमधील कार कशापद्धतीने चालकासमोर जाऊन उभी राहते हे दाखवण्यात आले आहे.

एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आपल्या वाहनांमध्ये एक नवीन फीचर जोडणार आहे, ज्यामध्ये ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने कार आपोआप मालकापर्यंत पोहोचेल. कंपनीचे सीईओ एलन मस्क यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एका व्हिडीओद्वारे उदाहरण देऊन याची घोषणा केली आहे. ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या मस्क यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले की, ते टेस्ला वाहनांमध्ये एका नवीन फीचरवर काम करत आहेत, ज्यामध्ये ‘ॲक्च्युअली स्मार्ट समन’ फीचरच्या मदतीने टेस्ला कार तुम्हाला कॉम्प्लेक्स पार्किंगमध्येही आपोआप शोधून काढेल.

ऑटोनॉमस ड्रायव्हिंग फीचर नेमकं काय आहे?

म्हणजेच, जर तुम्हाला पार्किंगमध्ये उभी असलेली तुमची कार शोधण्यात अडचण येत असेल, तर हे नवे तंत्रज्ञान फक्त तुमच्यासाठी आहे. त्यांनी पुढे लिहिले की, द समन आणि स्मार्ट समन फीचरसह टेस्ला कार आता कॉम्प्लेक्स पार्किंग लॉटमधून स्वत:च आपल्या कारचा मालक शोधेल. या फीचर अंतर्गत टेस्ला कार पार्किंग एरियाच्या ३९ फूट आत किंवा बाहेर जाऊ शकणार आहे. पर्सनल ड्राईव्ह आणि पार्किंग एरिया अशा ओळखीच्या आणि अंदाज लावता येण्याजोग्या क्षेत्रांसाठी हे खास फीचर डिझाइन केले आहे. एलन मस्क यांनी ड्रायव्हर एआयच्या एका पोस्टवरील उत्तरात ‘स्मार्ट समन’शी संबंधित ही पोस्ट शेअर केली आहे.

युजर्सनी केल्या अशा कमेंट्स

मस्क यांच्या पोस्टवर अनेकांनी हे फीचर खूप फायदेशीर ठरू शकते असे म्हटले आहे. त्याचबरोबर काहींनी या फीचरसह संपूर्ण एआय कॉन्सेप्टच धोकादायक असल्याचे म्हटले आहे. पोस्टवर कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की, माझ्याकडे इलेक्ट्रिक कार नाही, पण मला कधी इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर मी फक्त टेस्ला कार घेईन. दुसऱ्याने लिहिले आहे की, जर या फीचरमध्ये अचानक चूक झाली तर या कारने किती लोक चिरडले जातील कुणास ठाऊक, तर त्याला जबाबदार कोण असेल? तिसऱ्याने लिहिले आहे की, AI या पृथ्वीचा आणि कलियुगाचा अंत करेल.