मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे काही मुलं इतकी हुशार असतात की त्यांच्या खेळण्याच्या वयातच त्यांना मोठमोठ्या कंपन्या नोकरीची ऑफर देतात. आपण अशा अनेक बातम्या सोशल मीडियावर पाहात आणि वाचत असतो, ज्यामध्ये अनेक मुलांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर कमी वयात मोठं यश मिळवलेलं असते. तर काही मुलं अशी असतात ज्यांचे बोलणं चालणं पाहून ती भविष्यात काहीतरी मोठं काम करतील असा अंदाज लावला जातो, सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये कॅरेन काझी नावाच्या एका १४ वर्षाच्या मुलाला थेट एलॉन मस्कच्या कंपनीने नोकरीची ऑफर दिली आहे.
खरं तर, कॅरेन काझी हा खूप बुद्धीमान आहे, त्याची हुशारी ओळखून एलॉन मस्कच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीने त्याला नोकरीची ऑफर दिली. SpaceX ने कॅरेनला सॉफ्टवेअर इंजिनिअर पदाची ऑफर दिली आहे, जी कॅरेन लवकरच जॉईन करणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॅरेनचं वय केवळ १४ वर्ष आहे. या वयात अनेक मुलं खेळण्यात व्यस्त असतात, पण कॅरेन लहानपणापासूनच काहीतरी मोठं करायचं स्वप्न पाहत होता. अशातच त्याला एलॉन मस्कच्या कंपनीने ही ‘अनपेक्षित ऑफर’ दिल्यामुळे तो खूप खूश झाला आहे.
लहान वयात मोठी कामगिरी –
कॅरेनने त्याच्या लिंक्डइन पोस्टमध्ये या नोकरीच्या ऑफरची माहिती दिली आहे. त्याने म्हटलं, “मी स्टारलिंकच्या इंजिनिअरिंग टीममध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणार आहे, जी पृथ्वीतलावरील सर्वोत्तम कंपनी मानली जाते.” कॅरेन लवकरच सांता क्लारा युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमधून पदवीधर होणार आहे. पदवीनंतर तो SpaceX मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणार आहे. एवढ्या कमी वयात अशी कामगिरी करणारा कॅरेन पहिला पहिले व्यक्ती ठरला आहे.
हेही पाहा – असा जुगाड असेल तर धान्य दळण्यासाठी गिरणीत जायची गरजच काय? IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला भन्नाट Video पाहाच
लहानपणापासूनच हुशार –
कॅरेन दोन वर्षांचा होता तेव्हा त्याच्या पालकांना समजले की, त्यांचा मुलगा सामान्य नाही, तो इतरांपेक्षा खूप हुशार आहे. त्यांना हे जाणवलं त्याचं कारण म्हणजे, लहानपणी तो पूर्णच्या पूर्ण वाक्य न चुकता बोलायचा. तसेच त्याच्या शाळेत सकाळी रेडिओवर तो ज्या बातम्या ऐकायचा त्या सर्व शिक्षकांना पटकन आणि जशाच्या तशा सांगायचा असं त्याच्या पालकांनी सांगितलं.