आजच्या काळात भावा-भावांमधील भांडणे ही एक सामान्य बाब झाली आहे. परंतु राजस्थानच्या सिरोही भागात असे दोन भाऊ होते जे मरेपर्यंत एकत्र होते. सध्या या दोन भावांची अनोखी प्रेमकहाणी परिसरात चर्चेचा विषय आहे. या भावांमधलं प्रेम, आपुलकी आणि मरेपर्यंत एकत्र राहण्याची तळमळ याचं उदाहरण लोक देत आहेत. जाणून घेऊया या दोन भावांची गोष्ट.
राजस्थानच्या सिरोही येथील डांगराली गावात रावताराम आणि हिराराम हे दोन वृद्ध भाऊ राहत होते. या दोघांमध्ये बऱ्याच वर्षांचं अंतर होतं परंतु या भावांनी एकमेकांना आयुष्यभर साथ दिली. योगायोग म्हणजे या दोन्ही भावांचं लग्न एकाच दिवशी झालं आणि यांचा मृत्यू देखील एकाच दिवशी झाला. रावताराम आणि हिराराम यांनीही अवघ्या १५-२० मिनिटांच्या कालावधीत अखेरचा श्वास घेतला. जन्मापासूनच दोन्ही भावांमध्ये इतकं प्रेम होतं की, त्याचा दाखला दिला जातो. रावताराम व हिराराम यांच्या घरात यावेळी शोकाकुल वातावरण आहे.
लाइव्ह डिबेटमध्येच सुरु झाली मारामारी! भांडणाचा Video Viral
रावताराम (वय जवळपास ९० वर्षे) आणि हिराराम (वय जवळपास ७५ वर्षे) यांच्यामध्ये १५ वर्षांचे अंतर होते. परंतु यांचे आपापसातील प्रेम आणि बंधुभावाचे किस्से परिसरात प्रसिद्ध होते. परिवारातील सदस्यांना अजूनही विश्वास बसत नाही आहे की या दोघांनी एकत्र या जगाचा निरोप घेतला आहे. रावताराम यांचे पुत्र भिकाराम सांगतात, हिरराम यांची तब्येत गेले काही दिवस ठीक नव्हती परंतु त्यांचे वडील रावताराम मात्र अगदी तंदुरुस्त होते.
२८ जानेवारीला रावताराम यांनी सकाळपासून काहीही खाल्ले नाही. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या पत्नीला समजली तेव्हा त्यांनी त्यांना खाण्यासाठी आग्रह केला. त्यांच्या आग्रहास्तव रावताराम यांनी काही बिस्किटं खाल्ली आणि हिरराम यांची चौकशी करून ते झोपले. त्यानंतर मात्र ते उठलेच नाहीत. २९ जानेवारीला सकाळी ८ ते ९च्या दरम्यान त्यांनी जगाचा निरोप घेतला. तर दुसरीकडे, हिरराम यांना थंडी वाजत असल्याने त्यांनी उन्हात चारपाई ठेवण्यास सांगितली. त्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटातच त्यांचे देखील निधन झाले.