Disabled young man video: आयुष्यात कितीही आव्हानं आली तरी ते जगता आलं पाहिजे. कष्ट आणि अथक परिश्रमानेच आपण यश गाठू शकतो, असं म्हणतात. पोटाची भूक भागविण्यासाठी सगळेच आपापल्या परीने मेहनत करत असतात. त्यात अपंगत्व आलेलं असेल, तर आयुष्यात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. अशा परिस्थितीत अनेक माणसं हतबल होतात, निराश होतात आणि स्वत:लाच दोष देऊ लागतात. पण, अशा परिस्थितीतही स्वत:ची साथ न सोडता, जिद्दीनं जो उभा राहतो, तोच आयुष्यात पुढे जातो. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एका दिव्यांग तरुणाला आपल्या पोटात एक घास जावा यासाठी अथक परिश्रम करावे लागतायत.
पोटाची भूक भागवण्यासाठीची तळमळ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. या व्हिडीओमध्ये एक दिव्यांग तरुण एका ढाब्यावर जेवणासाठी आलेला दिसतोय. जेवणाची ऑर्डर जेव्हा त्याच्यासमोर येते तेव्हा दोन्ही हात गमावलेला हा तरुण खूप कष्टानं एक घास खातो.
आपले हात नसूनही तो हार मानत नाही. पायांची मदत घेऊन, तो एक घास कसाबसा खातो. आजूबाजूला अनेक माणसं जमलेली असतानादेखील त्याची मदत करायला कोणीही पुढे येत नाही. सगळे फक्त त्याच्याकडे बघत बसतात.
सोशल मीडियावरील नवरा-बायकोचा हा व्हिडीओ @gavran_tadka1122 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “… आणि तुम्हाला वाटतं तुमचं आयुष्य अवघड आहे”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल एक दशलक्ष व्ह्युज आले आहेत.
मुलाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “तुम्ही फक्त व्हिडीओ काढा. एखाद्यानं त्याला घास खाऊ घातला असता.” दुसऱ्यानं, “या व्हिडीओमधून कळतं की, काही झालं तरी संघर्ष स्वतःचा स्वतःलाच करावा लागेल आणि तोही मरेपर्यंत” अशी कमेंट केली. तर, “किती कष्टानं भावाला एक तुकडा खावा लागतो.” अशीदेखील कमेंट एकानं केली.