बाप आणि लेकीचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्यासारखा आपल्या लेकीला जपणारा हा बाप नेहमीच आपल्या लेकीच्या मागे खंबीरपणे उभा असतो. अगदी जन्म दिल्यापासून ते ती मोठी होईपर्यंत बाप आपल्या लेकीला सांभाळण्याची, तिचं रक्षण करण्याची, तिचं पालन-पोषण करण्याची आपली जबाबदारी कधीच विसरत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी घराचा आधार तो बाप असतो. दिवस-रात्र खूप कष्ट करून तो घरी येतो. कुटुंबाची भूक भागवण्यासाठी, दोन वेळचं अन्न मिळवण्यासाठी, तसंच मुलांच्या भविष्यासाठी तो राब राब राबत असतो. अनेकदा कामानिमित्त बापाला आपल्या मुलांपासून दूर राहावं लागतं आणि हा दुरावा खूप त्रासदायक असतो. पण, आतुरतेनं वाट पाहणाऱ्या लेकीला अचानक बापानं सरप्राईज दिलं तर… सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यामध्ये वडिलांना पाहून लेकीला रडू कोसळतं.

बाप आणि लेकीचा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका मॉलमध्ये आई आपल्या लहान मुलीबरोबर फिरत असते. तितक्यात मुलीला अचानक तिचे बाबा दिसतात. वडिलांना पाहून मुलीला आश्चर्याचा धक्काच बसतो. वडिलांना पाहताच ती त्यांना बिलगते. मग तिचे वडील मुलीला उचलून घेतात. वडिलांना मिठी मारत मुलगी भावूक होते. तिचे अश्रू अनावर होतात आणि ती रडू लागते. व्हिडीओमधून कळून येतंय की, बाप आणि लेक प्रदीर्घ कालावधीनंतर एकमेकांना भेटले आहेत.

बाप आणि लेकीचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ @majalgaon_cha_statuswala या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला ‘जेव्हा बाबा मुलीला अचानक भेट देतात…’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसेच ‘वडील आणि मुलीचं प्रेम नेहमीच खूप खास असतं’, असंदेखील व्हिडीओवर लिहिण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला चार लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया या बाप-लेकीच्या व्हिडीओवर दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “नि:शब्द- क्षणांत डोळे भरून आले… अगदी खरंय बाप-लेकीचं नातं जरा जास्तच खास असतं.” दुसऱ्यानं, “बाबा आणि मुलगी– जगातलं सर्वांत गोड नातं,” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “मुलीच्या डोळ्यातले अश्रू सांगतात बापासाठी किती वाट पाहिली” एकानं कमेंट करीत लिहिलं, “खरं आहे, बाबांशिवाय या जगात जीव लावणारं कोणीच नाही.”