Viral Video: आजपर्यंत कित्येक जवान भारतासाठी शहीद झाले आहेत. या शहीदांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. आई-वडील, पत्नी, भावंडं, मुलं सर्वांना आयुष्यभर वीरमरण आलेल्या त्या व्यक्तीच्या आठवणीत आयुष्य घालवावं लागतं. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना अनेक प्रकारची मदत केली जाते. पण, म्हणतात ना एखाद्या व्यक्तीची जागा पैसा, सुख-सुविधा कधीच घेऊ शकत नाही. जरी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना अनेक प्रकारच्या मदतीचा हात मिळाला, तरी आपला माणूस गमावल्याचे दुःख कधीच विसरता येत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुमचेही मन नकळत भावनिक होईल.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील त्याच्या आई-वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. माणूस वयाने कितीही लहान असला किंवा मोठा असला तरी त्याला नेहमीच त्याच्या आई-वडिलांच्या सहवासाची आणि प्रेमाची ओढ असते. आई-वडिलांकडून मिळालेले प्रेम, शिकवण लहान पणापासूनच मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकते. परंतु, अनेकदा हे सुख प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक चिमुकला त्याच्या मृत आई-वडिलांच्या आठवणीत गाणं गाताना दिसतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका आर्मी स्कूलमधील चिमुकला शाळेच्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर उभा राहून आई-वडिलांच्या आठवणीत गाणं गात आहे. तो गात असलेल्या गाण्यामध्ये आई-वडिलांना मला तुमची खूप आठवण येते हे सांगत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आई-वडिलांच्या आठवणीतील दुःख पाहायला मिळत आहे. तो गाणं गाताना रडू येऊ नये म्हणून स्वतःचे रडू दाबण्याचा प्रयत्न करतोय. या चिमुकल्याचा हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरील नेटकरीही हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत.
दरम्यान, हा व्हिडीओ शेअर केलेल्या व्यक्तीने व्हिडीओवर लिहिलंय की, “हा मुलगा एका लष्करी अधिकाऱ्याचा मुलगा आहे, ज्याच्या वडिलांचा अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईदरम्यान मृत्यू झाला. ही बातमी कळताच त्याच्या आईचा धक्का बसून तिचादेखील मृत्यू झाला. तो बोर्डिंग आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिकत आहे. गाणं गाताना तो अश्रूंचा सामना कसा करतो हे पाहा. याच्यात किती आत्मविश्वास आहे… त्याचं गाणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं…”
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @punyachasarpanch या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास लाखो व्ह्युज मिळाले असून यावर लाखो लाइक्सही मिळाल्या आहेत, शिवाय अनेक नेटकरही यावर अनेक कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलंय की, “तो फौजीचा मुलगा आहे, तो कधीच हार मानणार नाही”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “हा व्हिडीओ पाहून मी खूप रडलो”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “देवा अशी वेळ या चिमुकल्याला का पाहायला लावली?”