आपल्यापैकी अनेकांना काही महत्वाच्या कामासाठी बॉसकडून सुट्टी मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हे चांगलच माहिती आहे. अनेकदा काही लोक खरं कारणं सांगून रजा मंजूर करता, तर काही कर्मचारी खोटी कारणं सांगून रजा घेत असतात. असे लोक कधीकधी आपल्या लांबच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याचं सांगायलाही कमी करत नाहीत. शिवाय अशा दुःखद परिस्थितीत बॉसलाही आपल्या कर्मचाऱ्याला काहीही प्रश्न न विचारता रजा देण्याशिवाय पर्याय नसतो.
तर एखाद्या कर्मचाऱ्याने आजारी पडल्याचं सांगून सुट्टी घेतली तर त्याच्याकडून वैद्यकीय कागदपत्रांचा मागणी केली जाते. पण सध्या अशी एक घटना समोर आली आहे, ज्यातील बॉसच्या अजब मागणीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हाँगकाँगमधील एका व्यक्तीने आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रजा मागितली होती. पण या व्यक्तीच्या बॉसने श्रद्धांजली वाहायला गेल्याचे पुरावे मागितल्याचं समोर आलं आहे.
‘कबरीचा फोटो पाठव…’
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, एका कर्मचाऱ्याने चिंग मिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी बॉसकडे १२ दिवसांची सुट्टी मागितली होती. चिंग मिंग हा चीनमधील असा फेस्टिव्हल आहे, ज्यामध्ये चिनी लोक त्यांच्या पूर्वजांच्या कबरींना भेट देतात आणि कबरी स्वच्छ करुन तिथे ते पूजा करतात. याच फेस्टिव्हलसाठी एका कर्मचाऱ्याने आपल्या बॉसला सुट्टी मागितली होती. त्यानंतर त्याच्या बॉसने या कर्मचाऱ्याला जो पुरावा मागितला तो वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या व्यक्तीच्या बॉसने पुरावा म्हणून चक्क आपल्या कर्मचाऱ्याला त्याच्या पूर्वजांच्या कबरींचे फोटो पाठवायला सांगितले, जे ऐकून अनेकांनी बॉसच्या मागणीचा निषेध केला आहे.
“बॉसला वेड लागलय आणि तो मलाही वेड करेल.”
आपल्या बॉसच्या या विचित्र मागणीबद्दल घटनेतील व्यक्तीने फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिलं, “माझ्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी रजा घेतली, पण माझ्या बॉसने मला हे सिद्ध करण्यासाठी कबरींचे फोटो पाठविण्यास सांगितले. हाँगकाँगमधील माझा बॉस वेडा बनत चालला आहे आणि तो मलाही वेड्यात काढत आहे.” या कर्मचाऱ्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या व्यक्तीला राजीनामा देण्याचा सल्ला दिला आहे. तर अनेकांनी बॉसचे कृत्य निंदनीय असल्याचंही म्हटलं आहे.