‘सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करु नका’, असं सतत सांगितलं जातं, तशा सूचना प्रशासनकडून दिल्या जातात, पण आता ऑफिसच्या वेळेत कमी धुम्रपान करा असं सांगण्याची वेळ आली आहे. त्याचं कारण म्हणजे नुकतीच अशी घटना उघडकीस आली आहे. ज्यामध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याने कामाच्या वेळेत सिगारेट पिण्यासाठी इतके ब्रेक घेतले आहेत की, त्याला या ब्रेकपायी तब्बल ११ हजार डॉलर म्हणजेच नऊ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कामाच्या वेळेत सिगारेट पिण्यासाठी ब्रेक घेतल्यामुळे या कर्मचाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण जपानमधील ओसाका येथील आहे. ओसाका येथील एक सरकारी कर्मचाऱ्याने १४ वर्षांत जवळपास ४,५०० पेक्षा जास्त वेळा धूम्रपान केल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे त्यांच्या पगारातील ९ लाख रुपये परत देण्यास सांगितलं आहे. शिवाय इथून पुढे ६ महिने त्याच्या पगारातून १० टक्के रक्कमेची कपात करण्यात येणार आहे.
हेही पाहा- Video: ‘त्या’ ९ जणांसाठी सोन्याची खाण ठरली मृत्यूचं दार! पुढे जे घडलं ते पाहून व्हाल थक्क
सिगारेटसाठी ४ हजार ५१२ वेळा ब्रेक –
६१ वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याने १४ वर्षांत ४ हजार ५१२ वेळा सिगारेट पिण्यासाठी ब्रेक घेतल्याचं उघडकीस आलं असून त्याने ही सर्व सिगारेट ऑफिसच्या वेळेत पिली आहेत. त्याने सिगारेट पिण्यासाठी ब्रेक घेतले कारण त्याला सिगारेट पिण्यासाठी ऑफिसच्या बाहेर जावं लागतं होतं. या कर्मचाऱ्याने एक दोन नव्हे तर कामाचे ३५५ तास सिगारेटसाठी वाया घालवल्याची बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी या कर्मचाऱ्यावर कारवाई केली. त्यानुसार त्याला तब्बल नऊ लाख रुपयांचा दंड करण्यात आला. शिवाय त्याच्या इतर दोन साथीदारांनाही शिक्षा सुनावण्यात आली.
रिपोर्टनुसार, ओसाकामध्ये सिगारेट पिण्याबाबत कडक नियम आहेत. या कर्मचाऱ्यांना लोकल पब्लिक सर्विस कायद्यांतर्गत कर्तव्यनिष्ठेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिक्षा करण्यात आली आहे. यापूर्वी २०२९ मध्ये ओसाका येथील हायस्कूलच्या शिक्षकावरही या प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यानेही कामाच्या वेळेत ३हजार ४०० वेळा सिगारेटचे पिण्यासाठी ब्रेक घेतला होता. त्यामुळे त्याच्याही पगारातून काही रक्कम कापण्यात आली होती.