जर तुम्ही त्या कर्मचाऱ्यांपैकी आहात ज्यांच्यावर दिलेल्या वेळेत टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव असतो, तर तुम्ही चीनमधील कंपनीत काम करत नाही यासाठी देवाचे आभारच मानले पाहिजे. चीनमधील एका कंपनीने टार्गेट पूर्ण न केल्याबद्दल कर्मचाऱ्यांना रस्त्यावर रांगण्याची अमानुष शिक्षा दिल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून युजर्स संताप व्यक्त करत आहेत.

टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एखाद्या गुराप्रमाणे रस्त्यावर रांगत जाण्यास सांगण्यात आलं होतं. रस्त्यांवर लोकांची आणि वाहनांची वर्दळ असताना कर्मचारी त्यातून मार्ग काढत रांगत होते. यावेळी एक व्यक्ती हातात कंपनीचं नाव असलेला झेंडा घेऊन सर्वांच्या पुढे चालत होता. कर्मचाऱ्यांना रस्त्यावर रांगताना पाहून तेथून जाणाऱ्या लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसत होता. अनेकजण रस्त्यात थांबून हा नेमका काय प्रकार आहे याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतं. सुदैवाने पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हा अमानुष प्रकार थांबला आणि कर्मचाऱ्यांची सुटका झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर कंपनी बंद झाली आहे. दरम्यान घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या असंवेदनशील वागण्याबद्दल रोष व्यक्त केला आहे. एका युजरने कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी ही कंपनी कायमची बंद झाली पाहिजे असं म्हटलं आहे.

काहीजणांनी ही शिक्षा मान्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही यासाठी जबाबदार ठरवलं आहे. पैशांसाठी ते आपली प्रतिष्ठा कशी काय पणाला लावू शकतात असा प्रश्न एकाने विचारला आहे. चीनमध्ये अशा प्रकारे कर्मचाऱ्यांवर अत्याचार होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी चांगली कामगिरी न करणाऱ्या कानाखाली मारण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Story img Loader